लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोना काळ सर्वांसाठी अग्निपरीक्षाच होती. मात्र, पालिकेने या संकटाचा यशस्वीपणे सामना करीत भयंकर संकट परतवून लावले. पालिकेच्या या ‘कोरोना लढय़ा’समोर नतमस्तक होत असल्याचे गौरवोद्गार ‘बिग बी’ अमिताभ बच्चन यांनी काढले.कोरोना काळात तत्कालीन अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांच्या अनुभवावर आधारित ‘मुंबई फाइट्स बॅक’ या पुस्तकाचे प्रकाशन बुधवारी झाले. यावेळी अमिताभ बच्चन यांनी पालिकेच्या कोरोना लढ्याचे कौतुक केले. आपण दोन वेळा कोविडने बाधित होतो आणि त्या आजारातून बाहेर पडल्याचे सांगितले.
मुंबईसारख्या लोकसंख्येची घनता जास्त असलेल्या शहरात कोविड विषाणूचा मुकाबला करणे हे अत्यंत मोठे आव्हान होते, मात्र पालिकेने दिवसरात्र एक करून केलेल्या कामांमुळे मुंबईचा कोविडविरोधातील लढा यशस्वी झाला असल्याचे ते म्हणाले. काकाणी यांच्या कोविडविरोधातील लढाईतील अनुभवांवर आधारित हे पुस्तक केवळ आरोग्याच्या दृष्टीनेच नव्हे, तर सामाजिकदृष्टय़ादेखील एक महत्त्वाचा दस्तऐवज आहे, असेही बिग बी यांनी अधोरेखित केले. भविष्यात साथरोगविषयक व्यवस्थापन करताना कोणत्या बाबींची काळजी घ्यावी याचीही रूपरेषा या पुस्तकात आहे, अशी माहिती पुस्तकाच्या सहलेखिका सुमित्रा डेबरॉय यांनी दिली.