मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (टी २) ते अंधेरी पूर्व मेट्रो ७ अ या मुंबईतील दुसऱ्या भुयारी मेट्रोचा दुसरा बोगदा मेअखेर पूर्ण होणार आहे. त्यामुळे ही मेट्रो सुरू होण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल पडणार आहे, अशी माहिती आता अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा (एमएमआरडीए) कडून मेट्रो ७ अ मार्गिकेची उभारणी सुरू असून, ३.४ किमी लांबीच्या या मार्गिकेवर एकूण दोन मेट्रो स्थानके आहेत. यातील डाऊनलाईन मार्गाच्या बोगद्याचे काम ‘दिशा’ या टनेल बोरिंग मशीनद्वारे (टीबीएम) नुकतेच पूर्ण करण्यात आले आहे. जवळपास १.६५ किमी लांबीचा हा मार्ग आहे. आता दुसऱ्या बोगद्याचे काम जलदगतीने पूर्ण करण्यावर एमएमआरडीएचा भर आहे. दुसऱ्या बोगद्याचे केवळ १०० मीटरचे काम शिल्लक असून, या मार्गिकेचा हा अवघड टप्पा मे अखेरपर्यंत पूर्ण होईल. त्यानंतर मार्गिका सुरू करण्यासाठी दीड वर्ष लागतील, असा अंदाज आहे. सद्य:स्थितीत या मेट्रो ७ अ मार्गिकेची ५९ टक्के कामे पूर्ण झाली असून, उर्वरित कामे पूर्ण होऊन मार्गिका सुरू होण्यासाठी डिसेंबर २०२६ उजाडणार आहे.
मेट्रो ७अची वैशिष्ट्ये लांबी : ३.४ किमी (उन्नत ०.९४ किमी, भूमिगत २.५०३ किमी)स्थानके : २ (उन्नत - एअरपोर्ट कॉलनी, भूमिगत - आंतरराष्ट्रीय विमानतळ टी२)उन्नत मेट्रो मार्गाची लांबी (व्हायाडक्ट) : ०.५७ किमीरॅम्पची लांबी : ०.३०९ किमीदुहेरी बोगद्यांची लांबी : २.०३५ किमीबोगद्याचा व्यास : ६.३५ मीटर
मीरा भाईंदरची थेट विमानतळाशी जोडणी
मेट्रो ७ अ मार्गिकेमुळे मीरा भाईंदर येथून निघालेल्या नागरिकांना थेट आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल २ ला पोहोचता येणार आहे. मेट्रो ९ मार्गिका, मेट्रो ७ मार्गिका आणि मेट्रो ७अ या तीन मेट्रो जोडल्या जाणार असल्याने प्रवाशांची मोठी सोय होणार आहे.
मुंबईत मेट्रोचे जाळे आणखी वाढणार
रेल्वे व्यतिरिक्त सार्वजनिक प्रवासी वाहतूक व्यवस्थेचा अन्य पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी एमएमआरडीएकडून मेट्रोचे जाळे वाढवण्याचा कसोशीने प्रयत्न सुरू आहे. विमानतळाबरोबरच अन्य दोन मेट्रो मार्गिकांना जोडणारा मेट्रो ७ अ हा भुयारी प्रकल्प त्याचाच भाग आहे.