ठाणे : साहित्यिकांना राज्य सरकार पुरस्कार देते. मात्र राज्य सरकारचे काम ‘लोकमत’ करीत असून साहित्य पुरस्कार देऊन साहित्यिकांचा सन्मान करीत आहे. ही खरोखरच कौतुकास्पद आणि उल्लेखनीय बाब असल्याचे काैतुकाेद्गार मराठी भाषा विभागाचे मंत्री दीपक केसरकर यांनी ‘लोकमत साहित्य पुरस्कार’ सोहळ्यात काढले. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांचा लोकमत समूहाद्वारे ‘जीवनगौरव पुरस्कारा’ने करण्यात येणारा सन्मान हा एका अर्थाने साहित्याचा गौरव असल्याचे ते म्हणाले. लोकमतचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा, समूह संपादक विजय बाविस्कर आणि लोकमत मुंबईचे संपादक अतुल कुलकर्णी यांनी केसरकर यांचे स्वागत केले.
यावेळी बोलताना केसरकर पुढे म्हणाले की, ‘‘ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांना केंद्र सरकारने यापूर्वीच ‘ज्ञानपीठ पुरस्कार’ देऊन मराठी भाषेचा सन्मान केला आहे. मराठीची उंची वाढविली आहे. ‘लोकमत’ने भालचंद्र नेमाडे यांना ‘जीवनगौरव पुरस्कार’ देऊन त्याला अधिकच उंचीवर नेऊन ठेवले आहे. मराठी भाषा राज्यात नव्हे तर राज्याबाहेर टिकली पाहिजे. ती सातासमुद्रापार गेली पाहिजे, यासाठी अन्य राज्यांत मराठी भाषा टिकविण्याकरिता राज्य सरकारकडून अनुदान दिले जाणार आहे. त्याचबरोबर सातारा, वाई येथील कृष्णेकाठी विश्वकोश अभ्यासाकरिता लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या स्मरणार्थ भव्य दालन उभारण्यात येणार आहे.’’