इर्शाळवाडीच्या मदतीला लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ धावले; मुंबईहून मोठी मदत घेऊन निघाले!

By मुकेश चव्हाण | Published: July 21, 2023 01:19 PM2023-07-21T13:19:35+5:302023-07-21T13:21:54+5:30

मुंबईतून प्रसिद्ध असलेलं 'लालबागचा राजा' सावर्जनिक मंडळाने देखील इर्शाळवाडीच्या ग्रामस्थांसाठी पुढाकार घेतला आहे. 

The workers of Lalbaugcha Raja Sarvajanik Ganeshotsav Mandal have left for Mumbaivarun Irshalwadi village with help | इर्शाळवाडीच्या मदतीला लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ धावले; मुंबईहून मोठी मदत घेऊन निघाले!

इर्शाळवाडीच्या मदतीला लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ धावले; मुंबईहून मोठी मदत घेऊन निघाले!

googlenewsNext

मुंबई: रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातल्या इर्शाळगडाखाली वसलेल्या इर्शाळवाडीवर मुसळधार पावसामुळे बुधवारी रात्री साडेदहाच्या सुमारास डोंगराचा वरचा कडा तुटून या वाडीवर पडला. दोन्ही भागांकडून मोठमोठे दगड कोसळल्याने ४९ घरांपैकी मधल्या भागातील सात ते दहा घरे वगळता सर्व घरे राडारोड्याखाली दबली. या घटनेत आतापर्यंत १६ जणांचा मृ्त्यू झाला आहे.

दरड कोसळताच पळत सुटलेले, धडपड करून आपला व इतरांचा जीव वाचवलेले आणि मदतकार्यादरम्यान बाहेर काढलेले १०३ जण या भीषण दुर्घटनेत वाचले. पण, अजून १००हून अधिक नागरिक ढिगाऱ्यात असल्याची भीती आहे. एनडीआरएफसह रायगड, ठाणे, मुंबई, नवी मुंबईतील मदत व बचाव पथकांनी धाव घेत अनेकांना वाचवले. कोसळणाऱ्या पावसामुळे मदतकार्यात प्रचंड अडथळे आले. अखेर काल संध्याकाळी मदतकार्य थांबवण्यात आले. त्यानंतर आज सकाळी ६.३० वाजता पु्न्हा बचावकार्य सुरु करण्यात आले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आवाहनाला रायगड जिल्ह्यातील उद्योग आणि स्वयंसेवी संस्थांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. स्थानिक ग्रामस्थांबरोबरच मदतकार्यासाठी तैनात मनुष्यबळासाठी अन्नाची पाकिटे, चादरी-ब्लॅंकेटस, तात्पुरते निवारे, कंटेनर, पाण्याच्या बाटल्या, टॉर्च, बिस्किटे तसेच प्रथमोपचार साहित्य आदी मदत साहित्याचा ओघ सुरु झाला आहे. आता मुंबईतून प्रसिद्ध असलेलं 'लालबागचा राजा' सावर्जनिक मंडळाने देखील पुढाकार घेतला आहे. 

सदर भीषण दुर्घटनेत जखमी आणि वाचलेल्या ग्रामस्थांसाठी लालबागचा राजा सार्वाजनिक गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते आज मोठी मदत घेऊन निघाले आहेत. दोन मोठे टेम्पोमधून ही मदत पोहचवली जाणार आहे. ज्यामध्ये महिला, पुरुष आणि लहान मुलांचे सर्व अत्यावश्यक कपडे, खाण्यासाठी सुका खाऊ तसेच विविध अन्नपदार्थ, ग्रामस्थांसाठी तसेच मदतकार्य करणाऱ्या प्रशासनाच्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी लागणाऱ्या सर्व जिवनाश्यक पदार्थ आणि वस्तूंचा यात समावेश करण्यात आला आहे. आज सकाळी १० वाजता लालबागच्या राजाचे कार्यकर्ते इर्शाळवाडीकडे रवाना झाले आहेत. लालबागचा राजा सार्वजनिक मंडळाने याआधी देखील अनेकवेळा सामाजिक भान राखत मदतकार्य राबविले आहे.

पायथ्याशी नियंत्रण कक्ष-

आज शुक्रवारी सकाळी साडे सहा वाजता एनडीआरएफ पथकाने शोध मोहीम सुरू केली आहे. पाऊस ही पडत असल्याने काही प्रमाणात शोध मोहिमेत अडचणी येत आहे. घटनास्थळापासून सुमारे चार किलोमीटर अंतरावर असलेल्या मानिवलीपर्यंत वाहने जाऊ शकतात. तेथे रुग्णवाहिका पोहोचल्या आहेत. खासगी डॉक्टरांचीही मदत टीएचओने बोलावली आहे. एनडीआरएफचे पथक, स्निफर डॉक स्क्वॉडही घटनास्थळी पोहोचून कार्य करीत आहे. डोंगराच्या पायथ्याशी तात्पुरता नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे.

जिल्ह्याला आज रेड अलर्ट

रायगड जिल्ह्याला शुक्रवार पुन्हा हवामान विभागाने रेड अलर्ट जाहीर केला आहे. त्यामुळे जिल्ह्यात सकाळ पासून पुन्हा मुसळधार पावसाने सुरुवात केली आहे. रेड अलर्ट असल्याने सर्व शासकीय यंत्रणा अलर्ट मोडवर आहेत. नागरिकांनी कामाशिवाय बाहेर पडू नका असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Web Title: The workers of Lalbaugcha Raja Sarvajanik Ganeshotsav Mandal have left for Mumbaivarun Irshalwadi village with help

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.