Join us

नवीन इमारती, वसतिगृहांची कामे कालमर्यादेत पूर्ण करावी; चंद्रकांत पाटील यांचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2024 3:41 PM

मंत्रालयात उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडील विविध इमारती, कार्यालये, जुन्या इमारतींच्या दुरूस्ती बाबत आढावा बैठक मंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. 

मुंबई: उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अधिपत्याखालील विद्यापीठ इमारती, विविध कार्यालये, वसतिगृहे, नवीन इमारत बांधकाम व इमारतींची दुरूस्तींची कामे कालमर्यादेत पूर्ण करावी. त्यासाठी नियोजन करून निधीची उपलब्धता सुनिश्चित करावी, असे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी आज दिले. मंत्रालयात उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडील विविध इमारती, कार्यालये, जुन्या इमारतींच्या दुरूस्ती बाबत आढावा बैठक मंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. 

भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय व भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर संग्रहालय इमारत बांधकाम प्रस्तावाबाबत सूचना देताना मंत्री पाटील म्हणाले, या इमारतीला आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल. इमारतीच्या संरचनेमध्ये काही बदल करावयाचे असल्यास आताच करून घ्यावे. या बदलानंतर अंदाजपत्रकीय तरतूदीवर परिणाम होणार नाही, याची दक्षता घ्यावी. प्रशासकीय मान्यता, निवीदा प्रक्रिया गतीने राबविण्यात यावी. सावित्रीबाई फुले मुलींच्या वसतिगृह इमारत बांधकाम सुरू करावे. पुढील दोन वर्षात मुलींना वसतिगृह उपलब्ध झाले पाहिजे. त्यानुसार नियोजन करावे, असं पाटील यांनी सांगितले.

महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ, मुंबई येथील प्रस्तावित बांधकामाबाबत निर्देश देताना मंत्री चंद्रकांत दादा पाटील म्हणाले, इमारत बांधकामाचा प्रस्ताव २५० कोटी रूपये तरतूदीमध्ये बसवावा. पुढे आणखी निधी लागल्यास त्या पद्धतीने कार्यवाही करावी. इमारतीचे काम फेजमध्ये करावयाचे असून तरी ह्या निधीमध्ये बसणारे फेज पुर्ण करावे. वांद्रे येथील सर जे. जे. कला महाविद्यालय संस्थेचे वसतीगृह व वास्तुशास्त्र वसतीगृह इमारतीचे काम सुरू करावे. हेरीटेज इमारत असल्यामुळे काम दर्जेदार करावे. एसएनडीटी विद्यापीठाच्या जुहू येथील सभागृहाचे काम बदल न करता पूर्ण करावे. वेळेची मर्यादा पाळावी. राज्यात शासकीय तंत्र निकेतन येथील विविध दुरूस्ती, रंगरंगोटीची कामे पुर्ण करावी. शासकीय तंत्र निकेतनच्या इमारती सुंदर कराव्यात, असे निर्देशही मंत्री पाटील यांनी यावेळी दिले. बैठकीत बांधकामाधीन, बांधकाम सुरू होणाऱ्या इमारतींचा विस्तृत आढावा घेण्यात आला. बैठकीला संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :महाराष्ट्र सरकारचंद्रकांत पाटील