Join us  

'इंडिया' आघाडीच्या मुंबईतल्या बैठकीबाबत जगाला उत्सुकता; संजय राऊत म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2023 5:22 PM

ही लढाई खूप मोठी आहे. २०२४ ची लढाई इंडिया जिंकणार आहे असा विश्वास संजय राऊतांनी व्यक्त केला.

मुंबई – येत्या ३१ आणि १ सप्टेंबरला मुंबईत होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी जगभरातून ३८ पत्रकार येणार आहेत. देशातील शेकडो पत्रकार या बैठकीचे कव्हरेज करायला येतील. शिवसेनेने यजमानपद स्वीकारलेल्या या बैठकीची उत्सुकता जगाला आहे. ३० तारखेला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेऊन या बैठकीबाबत अधिकृत कार्यक्रम सांगतील. देशातील प्रमुख २८ पक्ष उपस्थित राहणार आहेत असं खासदार संजय राऊत यांनी सांगितले.

संजय राऊत म्हणाले की, मुंबईच्या ग्रँड हयातमध्ये ही बैठक होईल. या बैठकीत इंडिया आघाडीचा लोगो अनावरण केले जाईल. तिन्ही पक्षाचा सोशल मीडिया एकत्र येऊन काम करतोय. या दोन दिवसाच्या बैठकीत देशातील १४० कोटी जनतेपर्यंत पोहचण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. इंडिया आघाडीच्या लोगो देशाची एकता दिसेल. अखंड भारताची उर्जा या लोगोत असेल. ६ राज्याचे मुख्यमंत्री येतील. सोनिया गांधी, राहुल गांधी, नितीश कुमार, एम के स्टॅलिन, जम्मू काश्मीरमधूनही नेते येतील. ही बैठक वैभवशाली असेल. त्याचा अजेंडा निश्चित करण्याचे काम सुरू आहे असंही त्यांनी सांगितले.

तसेच देश-विदेशातील पत्रकार ही बैठक कव्हर करण्यासाठी येणार आहे. ही लढाई खूप मोठी आहे. २०२४ ची लढाई इंडिया जिंकणार आहे. या बैठकीत नॅशनल अजेंडा तयार होईल. जो देशासाठी, संविधानासाठी आणि लोकशाही वाचवण्यासाठी असेल असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, शिंदे गटाकडे वेळ गोठवण्याची जादू आली नाही. देशात कायदा, न्यायालय आहे. विधानसभा अध्यक्षांच्या खुर्चीत बसलेल्यांनी समजून घेतले पाहिजे की आपण कायद्याचे रक्षक आहोत. या देशाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान दिले आहे. त्या संविधानानुसार जे काम करत नाहीत त्याला जनता कचऱ्याप्रमाणे फेकून देतील असा टोला संजय राऊतांनी लगावला आहे. आमदारांच्या अपात्रेबाबत शिंदे गटाकडून ६ हजार पानी उत्तर विधानसभा अध्यक्षांना देण्यात आले आहे. यावर पत्रकारांनी राऊतांना प्रश्न विचारला होता. त्यावर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

टॅग्स :संजय राऊतइंडिया आघाडी