वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ इंडिया मध्ये जगातल्या सर्वात मोठ्या अगरबत्तीची नोंद
By मनोहर कुंभेजकर | Published: January 2, 2024 04:51 PM2024-01-02T16:51:21+5:302024-01-02T16:51:32+5:30
या अगरबत्तीची नोंद वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ इंडियाने घेतली आहे. ही जगातली सर्वात मोठी अगरबत्ती आहे.
मुंबई-अयोध्येत दि,22 जानेवारीला होणाऱ्या श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेकडे देश विदेशातील लोकांचे लक्ष आहे. सर्व ठिकाणी जल्लोषमय वातावरणामध्ये उत्सव साजरे केले जात आहेत. त्यातच एक गुजरात मधील बडोदरा जिल्ह्यातील तरसाली शहरातील विहाभाई करशनभाई भारवाड यांनी तब्बल 108 फूट लांबीची अगरबत्ती बनवली आहे. या अगरबत्तीची नोंद वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ इंडियाने घेतली आहे. ही जगातली सर्वात मोठी अगरबत्ती आहे.
या अगरबत्तीचे वजन सुमारे 3611 किलोग्रॅम आहे. यामध्ये गुग्गुळ पावडर, कोकोनट पावडर, बारवी, हवन सामग्री पावडर, विविध औषधी फुले व देशी गीर गाईचे शेण तसेच तूप वापरले आहे. ही अगरबत्ती प्रभू श्रीराम जन्मभूमी मंदिर अयोध्या येथे ट्रॉलर द्वारे घेऊन जाणार आहेत. तिथे दिनांक 22 जानेवारी रोजी प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठेच्या वेळी प्रज्वलित करण्यात येणार आहे.
वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडिया यांच्याशी महाअगरबत्ती बनवणारे विहाभाई भारवाड यांनी संपर्क साधल्यानंतर वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ इंडियाच्या चीफ एडिटर सुषमा नार्वेकर तसेच वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ इंडियाचे विशेष प्रतिनिधी संजय नार्वेकर यांनी त्यांचे अभिनंदन केले. तसेच या महाअगरबत्तीची नोंद वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ इंडिया मध्ये करून त्याना प्रमाणपत्र व मेडल देऊन गौरविण्यात आले.
वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ इंडिया ही नेहमीच सातत्याने देशातल्या तसेच जगातल्या विविध कलागुणांनी युक्त असलेल्या अशा व्यक्तींच्या कलागुणांची दखल घेऊन त्याला एक व्यासपीठ देण्याचे काम अविरतपणे करते असे संजय नार्वेकर यांनी सांगितले.