मुलाला वाचवताना युवकाचा जीव गेला; पीडित कुटुंबाच्या मदतीसाठी भाजपा सरसावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2022 05:37 AM2022-07-08T05:37:52+5:302022-07-08T05:38:08+5:30
आशिषच्या अचानक जाण्याने त्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे
मुंबई - जुहू येथे मुसळधार पावसामुळे एका मुलाला वाचवताना एका आईने आपला मुलगा गमावला आणि दोन मुलांच्या डोक्यावरील वडिलांचे छत्र हरपले. या पीडित कुटुंबाच्या मदतीसाठी भारतीय जनता युवा मोर्चाचे मुंबई अध्यक्ष तेजिंदरसिंग तिवाना यांनी २५,००० रुपयांची आर्थिक मदत देऊन पुढाकार घेतला आहे. भाजप मुंबई युवा मोर्चाचे कार्यकर्ते मदतीसाठी जुहू येथील आशिषच्या घरी पोहोचले होते. त्यावेळी त्यांनी या कुटुंबाचं सात्वन केले.
3 जुलै रोजी संध्याकाळी सांताक्रूझचा रहिवासी आशिष आणि त्याची मुले कुटुंबियांसोबत वेळ घालवण्यासाठी जुहू बीचवर गेले होते. कुटुंबातील सदस्य हसत हसत पावसाचा आनंद घेत होते. तेवढ्यात तेथे एक लहान मूल पाण्यात बुडत असल्याचे आशिषने पाहिले. कशाचीही पर्वा न करता आशिषने मुलाला वाचवण्यासाठी पाण्यात उडी मारली. आशिषने बुडणाऱ्या मुलाला वाचवले. आशिषने मुलाला तिथे उपस्थित असलेल्या अन्य व्यक्तीच्या स्वाधीन केले. मात्र आशिषचा पाय पाण्याखाली काही खडकांमध्ये अडकला आणि आशिष बाहेर येऊ शकला नाही. आशिषने एका अनोळखी मुलाचा जीव वाचवला पण स्वत:चा जीव गमावला.
आशिषच्या अचानक जाण्याने त्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यामुळे त्यांना आधार देण्यासाठी भाजपा युवा मोर्चा मुंबईचे अध्यक्ष तेजिंदरसिंग तिवाना आणि त्यांच्या इतर कार्यकर्त्यांनी आशिषच्या कुटुंबीयांची भेट घेत त्यांना आर्थिक मदत केली. तसेच आशिषच्या मुलांसाठी पुस्तके, दप्तर व इतर शैक्षणिक साहित्य दिले. तिवाना यांनी आशिषच्या वृद्ध आईशी संवाद साधताना भाजप युवा मोर्चाचा प्रत्येक कार्यकर्ता मध्यरात्रीही आशिषच्या मुलांसाठी आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबासाठी उभा आहे आणि आशिषच्या कुटुंबाला कोणताही त्रास होऊ देणार नाही अशी ग्वाही दिली.
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना तिवाना म्हणाले की, आईचे दुःख आपण कमी करू शकत नाही पण अशा कठीण काळात मुंबईकरांच्या पाठीशी उभे राहणे ही आपली जबाबदारी आणि कर्तव्य आहे. आज आम्ही आशिषच्या कुटुंबासाठी आर्थिक मदत केली आहे. आशिषच्या मुलांना शैक्षणिक साहित्य दिले आहे. यासोबतच आशिषच्या कुटुंबाला कुठलीही अडचण होणार नाही यासाठी भाजपा पाठिशी राहील. आशिषच्या आईने आपला एक मुलगा गमावला असेल पण भाजप युवा मोर्चा मुंबईचे ४००० पुत्र सदैव तिच्यासोबत असतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.