Join us

ब्रेकच्या ऐवजी चुकून ॲक्सीलेटर दाबत तरुणाला चिरडले ! अंधेरीत टेस्ट ड्रायव्हिंगदरम्यान अपघात 

By गौरी टेंबकर | Published: June 06, 2024 10:21 AM

ड्रायव्हिंग टेस्टच्या गाडीने दिलेल्या धडकेत तरुण गंभीर जखमी झाला.

गौरी टेंबकर - कलगुटकर, मुंबई : चार चाकी गाडीचे पक्के लायसन्स घेण्यासाठी अंधेरी प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये गेलेल्या मोहम्मद मोईन शेख (२५) हा अन्य अर्जदार रविकुमार सहा (२७) याच्या ड्रायव्हिंग टेस्टच्या गाडीने दिलेल्या धडकेत गंभीर जखमी झाला. हा प्रकार तो ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅकवर उभा असल्याने झाल्याचे आरटीओ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र, हा ट्रॅक स्पष्टपणे दिसत नसल्याने आरटीओ अधिकाऱ्यांच्या निष्काळजीमुळे अपघात घडल्याचा कुटुंबीयांचा आरोप आहे. 

मोईन याची काकू फरीदा शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी मोईन त्याची बहीण हिनासोबत ड्रायव्हिंग टेस्ट देण्यासाठी अंधेरी आरटीओला आला होता. हिना त्याचा फॉर्म भरण्यासाठी आत गेली. त्यावेळी तो बाहेरच उभा असताना आरटीओची ड्रायव्हिंग टेस्ट घेणारी गाडी भरधाव शेजारी पार्क केलेल्या दुचाकी आणि टॅक्सीला धडक देत मोईनच्या दिशेने आली. त्यावेळी गाडीत सहा, मोटार वाहन निरीक्षक भागवत मोरे बसले होते. बेसावध मोईनला गाडीची धडक बसल्याने तो खाली पडला. यावेळी कारची दोन्ही चाके अंगावरून गेल्याने मोईन जखमी झाला. हिनाने मोईनला क्रिटी केअर व पुढे कुपर रुग्णालयात हलविले असून, तेथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

अदृश्य ड्रायव्हिंग ट्रॅक-

अंधेरी आरटीओमध्ये ड्रायव्हिंग टेस्टसाठी वापरात असलेला ट्रॅक अदृश्य आहे, असे अर्जदार सांगतात. सुरक्षेची कोणतीही खबरदारी न घेता ड्रायव्हिंग चाचण्या घेतल्या जातात. कोणतेही सुरक्षारक्षक नसून मोकळ्या जागेत टेस्ट घेतली जाते, असे अर्जदार चालकांचे म्हणणे आहे. योग्य ट्रॅक नाही, सोयीसुविधांचा अभाव आहे, याबाबत आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना आधीच कळवले आहे. आम्ही ज्या आरटीओ कार्यालयाच्या आवारात वाहन चालविण्याच्या चाचण्या घेतो, तेथे काही ठिकाणी उभे राहू नका, असे सूचना फलक लावल्याचे अधिकारी सांगतात. 

गुन्हा नोंदवणार, परवानाही रद्द होणार-

ब्रेकऐवजी ॲक्सीलेटर दाबत या अपघाताला कारणीभूत असलेल्या सहाच्याविरोधात अंबोली पोलीस ठाण्यात आम्ही गुन्हा दाखल करणार आहोत. त्याचा परवानादेखील रद्द करण्यात येईल, अशी माहिती आरटीओ अधिकारी रावसाहेब रगडे यांनी दिली. मात्र, मोरेवर कोणती करवाई केली जाईल, याबाबत त्यांनी काही स्पष्ट केले नाही.  

टॅग्स :मुंबईअंधेरीआरटीओ ऑफीसअपघात