मुंबई : उद्योगपती रतन टाटा यांना धमकी देणाऱ्या एका तरुणाला मुंबई पोलिसांनी कर्नाटक येथून शोधले आहे. मात्र, तो मानसिक रुग्ण असल्याचे आढळून आल्यावर त्याच्याविरोधात कोणतीही कारवाई न करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे.
या तरुणाने इंजिनियरिंग व एमबीए असे शिक्षण घेतले असून तो स्किजोफ्रीनिया आजाराने ग्रस्त असल्याची माहिती आहे. या तरुणाने मुंबई पोलिसांना फोन करून रतन टाटा यांना धमकी देत असल्याचे सांगितले. त्यानतंर पोलिसांनी तातडीने दोन पथके स्थापन केली. एका पथकाच्या माध्यमातून टाटा यांची सुरक्षा वाढविण्यात आली तर, दुसऱ्या पथकाने त्याने केलेल्या फोनचा माग काढण्यास सुरुवात केली.
तांत्रिक तपासातून तो फोन कर्नाटकमध्ये असल्याचे निष्पन्न झाले. ज्या फोनवरून त्याने पोलिसांना फोन केला होता तो फोन देखील त्याने चोरला होता. तपासा दरम्यान तो पुण्याचा रहिवासी असल्याचे आढळून आले. त्यानंतर पोलिस त्याच्या पुण्यातील घरी गेले असता त्याच्या पत्नीने तो पाच दिवसांपासून गायब असल्याचे सांगितले व तशी तक्रार देखील पुणे पोलिसांत केल्याचे तीने सांगितले. त्याचा मनोविकार विचारात घेऊन पोलिसांनी कारवाई न करण्याचा निर्णय घेतला आहे.