तरुण, आश्वासक चेहरा हरपला; घोसाळकरांच्या हत्येमुळे ठाकरे गटात अस्वस्थता
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2024 07:17 AM2024-02-10T07:17:19+5:302024-02-10T07:18:02+5:30
अभिषेक घोसाळकरांच्या हत्येमुळे ठाकरे गटात अस्वस्थता
जयंत होवाळ
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येमुळे दहिसर-बोरीवली भागात शिवसेनाउद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठी पोकळी जाणवणार आहे. अभिषेक यांचे वडील माजी आमदार विनोद घोसाळकर आजही राजकारणात सक्रिय असले तरी अभिषेक हे या भागातील ठाकरे गटासाठी भविष्यातील तरुण आश्वासक चेहरा होता. या भागात भाजप, शिंदे गटाशी दोन हात करण्यात घोसाळकर कुटुंबच आघाडीवर आहे. अभिषेक यांच्या निधनाने विनोद घोसाळकर यांच्या खांद्यावर पक्षाची सगळी जबाबदारी आली आहे.
शिवसेनेतील फुटीनंतर नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी पक्षाला रामराम ठोकून शिंदे गटात प्रवेश केला. मात्र, घोसाळकर कुटुंबाने ठाकरे यांची साथ सोडली नव्हती. विनोद घोसाळकर यांचा सुरुवातीच्या काळात सध्याचे भाजप आमदार प्रवीण दरेकर यांच्याशी संघर्ष व्हायचा. हे दोघेही तेव्हा शिवसेनेच्या भारतीय विद्यार्थी सेनेत कार्यरत होते. बोरीवली- दहिसर भागात आपले नेतृत्व प्रस्थापित करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. कालांतराने दरेकर यांनी अनुक्रमे मनसे आणि भाजपमध्ये प्रवेश केला.
विनोद घोसाळकर यांनी या भागात ‘उबाठा’चे अस्तित्व कायम ठेवले आहे. स्वत: ते दोन टर्म आमदार होते. मात्र, २०१४ आणि २०१९ सालच्या निवडणुकीत भाजपच्या मनीषा चौधरी यांनी त्यांचा पराभव केला.
२०१९ सालच्या निवडणुकीआधी शीतल म्हात्रे, शुभा राऊळ आणि घोसाळकर यांच्यातील वादाचा चांगलाच फटका घोसाळकर यांना बसला होता. त्यांचे पक्षातील महत्त्वही कमी करण्यात आले होते.
काँग्रेस,राष्ट्रवादी आणि शिवसेना या तीन पक्षाचे सरकार सत्तेत आल्यानंतर घोसाळकर पुन्हा वर आले. अभिषेक यांची कारकीर्द खऱ्या अर्थाने २०१२ सालापासून सुरू झाली. दहिसरच्या वॉर्ड क्रमांक १ मधून ते नगरसेवक म्हणून निवडून आले. पुढील निवडणुकीत वॉर्ड महिलांसाठी राखीव झाला तेव्हा त्यांची पत्नी तेजस्विनी निवडून आल्या.
इनोवेटिव्ह उपक्रम राबविणारा राजकारणी अशी अभिषेक यांची ओळख होती. आयसी कॉलनीतील रस्ता रुंदीकरणाच्या वेळी झाडे तोडण्याच्या विरोधात स्थानिक ख्रिश्चन महिला रस्त्यावर उतरल्या होत्या. त्यावेळी अभिषेक यांनी पालिका अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन खुबीने मार्ग काढला होता. राजकारण करता करता त्यांनी सहकार क्षेत्रातही प्रवेश केला होता.
मुंबई बँकेच्या संचालक मंडळावर ते निवडून आले होते. सध्या या भागात ठाकरे गटाला शिंदे गट आणि भाजप या दोन दोन आघाड्यावर लढावे
लागत आहे.
अभिषेक यांच्या मृत्यूनंतर विनोद घोसाळकर आणि अभिषेक यांच्या पत्नी तेजस्विनी यांच्यावरच पक्षाची मदार असेल.