मुंबई : वाकोला येथील गौरीकुमारी साहू (वय २०) या तरुणीने मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड अंधेरी पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली. मात्र, याप्रकरणी अद्याप गुन्हा दाखल न झाल्याने आता न्यायालयात धाव घेणार असल्याचे तिने म्हटले आहे.
गौरी ही वाणिज्य पदवीधर आहे. तसेच ती चकाला येथील एका खासगी सुरक्षा प्रशिक्षण संस्थेत काम करते. २१ ऑक्टोबरला गौरी घाटकोपरला निघाली. तेव्हा चकाला मेट्रो स्टेशनवर दुपारी तिची मैत्रीण ट्रेनमध्ये शिरली; पण दरवाजे बंद झाल्याने गौरी मागे फिरली. तथापि, तिच्या ड्रेसचे खालचे टोक दारात अडकले. तितक्याच मेट्रो सुरू झाली आणि ती फलाटाच्या शेवटच्या पोलपर्यंत फरफटत गेली.
गौरीने लोकमतला दिलेल्या माहितीनुसार ती १५ मिनिटे जखमी अवस्थेत पडून होती. उपचारादरम्यान तक्रार केल्यास रुग्णालयाचे लाखो रुपयांचे बिल भरणार नाही असे सांगत वडिलांवर प्रशासन व संबंधित तपास यंत्रणेकडून दबाव टाकत खटला दाखल करणार नाही, असे लिहून घेण्यात आल्याचे गौरी म्हणाली.
हाताचे हाड तीन ठिकाणी तुटले अपघातात हाताचे हाड तीन ठिकाणी तुटल्याने प्लेट घातली असून लिव्हरलादेखील गंभीर दुखापत झाल्याचे गौरी म्हणाली. अंधेरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संताजी घोरपडे यांना विचारले असता आम्ही याप्रकरणी जबाब नोंदविला असून, चौकशी सुरू आहे, असे ते म्हणाले. दरम्यान, मेट्रो प्रशासनाने कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.