कलाकार मंडळींसाठी सरसावले रंगभूमीवरील ‘थिएटर दोस्त’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:09 AM2021-05-05T04:09:06+5:302021-05-05T04:09:06+5:30

काेराेनाबाधित कलावंतांसाठी सामाजिक उपक्रम राज चिंचणकर लोकमत न्यूज नेटवर्क ‘छोटीशी मदत, छोटीशी सुरुवात’; असे ब्रीदवाक्य घेऊन रंगभूमीवरील काही संवेदनशील ...

'Theater Friend' on the stage for artists! | कलाकार मंडळींसाठी सरसावले रंगभूमीवरील ‘थिएटर दोस्त’!

कलाकार मंडळींसाठी सरसावले रंगभूमीवरील ‘थिएटर दोस्त’!

Next

काेराेनाबाधित कलावंतांसाठी सामाजिक उपक्रम

राज चिंचणकर

लोकमत न्यूज नेटवर्क

‘छोटीशी मदत, छोटीशी सुरुवात’; असे ब्रीदवाक्य घेऊन रंगभूमीवरील काही संवेदनशील कलाकार कोरोना प्रादुर्भावाच्या काळात ‘दोस्त’ बनून त्यांच्या सहकलाकारांच्या साहाय्यासाठी सरसावले आहेत. यासाठी मुंबईतील रंगभूमीशी संबंधित काही युवा रंगकर्मी एकत्र आले आहेत. हे रंगकर्मी कोरोनाचा संसर्ग झालेल्या त्यांच्या सहकलाकारांना ‘थिएटर दोस्त’ या उपक्रमाअंतर्गत आवश्यक त्या सोयीसुविधा पुरविणार आहेत.

या कलाकार मंडळींनी या उपक्रमासाठी एक ग्रुप निर्माण केला आहे. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, तसेच डॉक्टरांनी सुचवलेल्या औषधींनुसार; कोरोनाचा संसर्ग झालेल्या कलाकार मंडळींना ही मंडळी त्यांच्या घरांच्या जवळ असलेल्या केमिस्टच्या मदतीने कोरोनाची प्राथमिक औषधी अत्यल्प दरात किंवा मोफत देणार आहेत. तसेच त्यांच्या काही वैद्यकीय चाचण्या, घरगुती सामान, अन्नधान्य, जेवणाचे डबे यासाठीही ही मंडळी काम पाहणार आहेत. ज्या सहकलाकार मंडळींचे बजेट सध्याच्या काळात पार कोलमडले आहे; त्यांच्यासाठी या उपक्रमाची रुजवात करण्यात आली आहे.

हा उप्रक्रम राबवताना या मंडळींतर्फे प्रत्येक विभागानुसार गरजू रुग्णांसाठी जेवण, टेली डॉक्टर्स, विलगीकरण कक्ष आदींची विभागवार यादी तयार करण्यात येत आहे. या कार्यासाठी ही मंडळी स्वयंसेवकांचाही शोध घेत आहेत. सामाजिक बांधिलकी म्हणून लोकांनीही यासाठी हातभार लावावा आणि त्यासाठी या ग्रुपच्या theatredost@gmail.com या ईमेलवर संपर्क साधण्याचे आवाहन या ग्रुपतर्फे करण्यात आले आहे. अक्षय शिंपी, मंजिरी पुपाला, सुनील शानभाग, प्रियांका चरण, सौम्या त्रिपाठी, कल्याणी मुळे, सपन सरण आदी कलाकार मंडळी ‘थिएटर दोस्त’च्या या सामाजिक उपक्रमासाठी कार्यरत आहेत.

सपोर्ट सिस्टिमसाठी उपक्रम

कलाकारांसाठी कलाकारच काम नाही करणार, तर कोण करणार? आपल्याकडे मनुष्यबळ खूप आहे. मात्र, सपोर्ट सिस्टिमचा अभाव जाणवतो. कलाकारांसाठी तर कोरोना प्रादुर्भावाच्या गेल्या वर्षभरात अशी काही सिस्टिम मला दिसली नाही. सध्याच्या स्थितीत अशा सपोर्ट सिस्टिमचा आपणही एक हिस्सा असावा, असे वाटले म्हणून आम्ही हा उपक्रम हाती घेतला आहे.

- अक्षय शिंपी (अभिनेता)

-----------------------------------------------------------------------------------------------

Web Title: 'Theater Friend' on the stage for artists!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.