Join us

कॅन्सर रुग्णालयाच्या जागेत नाट्यगृहच

By admin | Published: November 19, 2014 11:12 PM

मॉडेला मिलच्या ५० टक्के जागेत पार्कींग आणि उर्वरित जागेत कॅन्सर रुग्णालय उभारण्याचा प्रस्ताव महापालिकेने येत्या महासभेत मंजुरीसाठी आणला असला

ठाणे : मॉडेला मिलच्या ५० टक्के जागेत पार्कींग आणि उर्वरित जागेत कॅन्सर रुग्णालय उभारण्याचा प्रस्ताव महापालिकेने येत्या महासभेत मंजुरीसाठी आणला असला तरी तेथे नाट्यगृहच बांधण्याचा चंग सत्ताधाऱ्यांनी केला असून त्यानुसार कॅन्सर रुग्णालयाला वसंत विहार येथील सुरेंद्र मील कंपाऊंडमध्ये शिफ्ट करण्याचा ठराव आणण्याचा प्रयत्न चालविला आहे़वागळे इस्टेट येथील मुंबईच्या वेशीवर असलेल्या मॉडेला मिलच्या जागेत ठाणे महापालिकेचे वाहनतळाचे आरक्षण असून या आरक्षणाच्या ५० टक्के जागेत वाहनतळ आणि निम्या जागेत अद्ययावत कॅन्सर रुग्णालय उभारण्यासंदर्भातील प्रस्ताव पालिकेने पुढे आणला आहे. मात्र, येथील ५० टक्के जागेवर नाट्यगृह उभारण्यात यावे अशी मागणी विरोधी पक्षनेते एकनाथ शिंदे यांनी केली आहे. परंतु, प्रशासनाने त्याठिकाणी रुग्णालयच उभारण्याचे निश्चित केले आहे. त्यानुसार या संदर्भातील प्रस्ताव गुरुवारी होणाऱ्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर येणार आहे. मुंबई येथे झालेल्या गिरणी कामगारांच्या संपानंतर ठाण्यातील मॉडेला मिल बंद झाली होती. या मिलच्या जागेत अंदाजे ८०० वाहने उभी राहण्यासाठी वाहनतळाचे आरक्षण अहे. ते विकसित करण्याचा प्रयत्न तत्कालीन आयुक्त टी. चंद्रशेखर यांनी केला होता. परंतु हे काम अद्याप झाले नाही. दरम्यान या जागेचा विकास निर्मल लाईफ स्टाइलने हाती घेतल्यानंतर माजी आयुक्त आर. ए. राजीव यांनी या विकासकाकडून वाहनतळ बांधून घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, या आरक्षणापैकी ५० टक्के जागेत वाहनतळ आणि उर्वरित जागेत कॅन्सर रुग्णालय बांधण्याचा प्रशासनाचा मानस आहे. तसा फेरबदल करण्याच्या प्रक्रियेसाठी महासभेची मान्यता घेण्यात येणार आहे.परंतु पालिकेने आणलेल्या या फेरबदलाच्या प्रस्ताव नगरसेवक आणखी फेरबदल करणार असून रुग्णालयाच्या जागेवर नाट्यगृह उभारण्यासाठी त्यांनी आग्रह धरला आहे. त्यानुसार या संदर्भातील महासभेत सभागृह नेते नरेश म्हस्के मांडणार आहेत. विशेष म्हणजे कॅन्सर रुग्णालय हे वसंत विहार येथे शिफ्ट करण्याचाही ठरावही यावेळी मंजूर केला जाणार आहे. वसंत विहार येथे असलेल्या सुरेंद्र मिलच्या जागेवर हे रुग्णालय उभारले जावे अशी मागणी यावेळी केली जाणार आहे. (प्रतिनिधी)