Join us

नाट्यगृह उत्तम; पण प्रेक्षक कधी, कसे येणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2023 8:35 AM

या नाट्यगृहाकडे प्रेक्षकांनी वळण्याची गरज आहे.

विशाखा सुभेदार, अभिनेत्री, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मी अंबरनाथची असल्याने कल्याणमधील आचार्य प्रल्हाद केशव अत्रे रंगमंदिर मला अधिक जवळचे आहे. माहेर ठाण्यात असल्याने पूर्वी गडकरी रंगायतन प्रिय होते. आता अत्रे रंग मंदिरमध्ये वावरताना घरीच असल्यासारखे वाटते. कुठलीही निर्मितीसंस्था जेव्हा कल्याणसारख्या ठिकाणी येऊन प्रयोग करते तेव्हा तिथे प्रयोग करणे व्यावसायिकदृष्ट्या परवडायला हवे. यासाठी रसिकांचा प्रतिसाद गरजेचा असतो. इथे कधी चांगले बुकिंग मिळते. हे नाटकावरही अवलंबूनही असते. आजवर बरीच नाटके केली, पण इथे कधी हाऊसफुल प्रयोग झालेला आठवत नाही. या नाट्यगृहाकडे प्रेक्षकांनी वळण्याची गरज आहे.

इथे खूप मोठी मराठी वस्ती असल्याने त्यांच्यापर्यंत नाटक पोहोचवण्यासाठी कलाकार येतात. प्रेक्षकांनीही याची दखल घ्यायला हवी. नाट्यगृह वर्दळीच्या रस्त्यावर असूनही पार्किंगची चांगली सोय आहे. पूर्वी इथे बॅकस्टेजवाल्यांना सर्व गोष्टी उचलून न्याव्या लागायच्या, पण त्यात सुधारणा करण्यात आली आहे. तरीही लिफ्ट असायला हवी. ज्येष्ठ कलाकारांसाठी ते सोयीचे होईल. कलाकार जिथून प्रवेश करतात तिथे बॅकस्टेजच्या रंगकर्मींसाठी स्वच्छतागृह आहे, जे अस्वच्छ असल्याने नाट्यगृहात प्रवेश करण्यापूर्वीच दुर्गंधीचा सामना करावा लागतो. रंगमंदिरात शिरतानाच या गोष्टीला सामोरे जावे लागणे खटकते. हे स्वच्छतागृह तिथून हलवायला हवे. त्याची स्वच्छता राखल्यास वातावरणही फ्रेश होईल. पूर्वी हे स्वच्छतागृह उघडे होते. आता बंदिस्त केले असले तरी अस्वच्छ असते.

ग्रीन रूममध्ये बसण्याची व्यवस्था थोडी अडचणीची

मेकअप रूम्स अप्रतिम आहेत. कलाकारांची स्वच्छतागृहे स्वच्छ असतात. पूर्वी दरवाजांच्या कड्या लागत नसायच्या, ज्या आता सुस्थितीत आहेत. वातानुकूलित यंत्रणाही चांगली आहे. ॲकॉस्टिक्सची काहीच समस्या नाही. व्यवस्थापन करणाऱ्या कर्मचाऱ्यांची वागणूक चांगली आहे. पडद्यापासून बेल देणाऱ्यांपर्यंत सर्व व्यवस्थित आहे. रंगमंच मोठा असल्याने विंगेत चांगली जागा आहे. पूर्वी काही समस्या होत्या, पण सध्या देखभाल चांगल्या प्रकारे केली जात आहे. चहा-पाण्याची सोय आहे, पण इतर खाद्यपदार्थ बाहेरून मागवावे लागतात. सगळ्याच नाट्यगृहांमधील व्हीआयपी रूम्स जशा चांगल्या असतात तशा ग्रीन रूम्स नसतात. इथे ग्रीन रुममध्ये बसण्याची व्यवस्था थोडी अडचणीची आहे, पण त्यात सुधारणा करायला वाव नाही. महिलांच्या ग्रीनरूमला स्वच्छतागृह ॲटॅच्ड आहेत. सगळ्या वस्तू नीट आहेत. प्रेक्षकांसाठीही ऐसपैस जागा आहे. एका प्रयोगानंतर दुसऱ्या प्रयोगापूर्वी नाट्यगृह स्वच्छ केले जाते.

जे कलावंत मेहनतीने बसवलेल्या नाटकातून आपल्याला वेगळी अनुभूती देतात. त्यांना नाट्यगृहात काम करताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. नाट्यगृहाविषयीच्या विधायक सूचना त्यांनी केल्या आहेत. मान्यवर कलावंत आपल्यासमोर त्यांची भूमिका मांडत आहेत. आचार्य प्रल्हाद केशव अत्रे नाट्यगृहाविषयी प्रख्यात अभिनेत्री विशाखा सुभेदार आपल्या भेटीला आल्या आहेत. आपणही 8108899877 या नंबरवरच्या व्हॉट्सॲपवर आपली प्रतिक्रिया देऊ शकता.

प्रेक्षकांच्या बोलक्या प्रतिक्रिया…

तिकीट खिडकीच्या समोरील भिंत वर्तुळाकार असल्याने खिडकी लगेच दिसत नाही. त्यामुळे बुकिंगसाठी गर्दी आहे की नाही हे लांबून समजत नाही. पार्किंग बेसमेंट असल्याचा त्रास वयस्कर नागरिकांना होतो. त्यांना वरच कुठेतरी गाडी लावायला द्यायला हवी. व्यवस्थापनाने याचा विचार करावा.

 

टॅग्स :नाटक