मुंबईत रंगणार ‘थिएटर आॅलिम्पिक्स’; २४ मार्च ते ७ एप्रिलपर्यंत महोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2018 12:41 AM2018-03-18T00:41:56+5:302018-03-18T00:41:56+5:30
नॅशनल स्कूल आॅफ ड्रामा (एन.एस.डी.) अर्थात नवी दिल्ली येथील राष्ट्रीय नाट्य विद्यालयाने २४ मार्च ते ७ एप्रिलदरम्यान ८व्या ‘थिएटर आॅलिम्पिक्स’चे आयोजन मुंबईत केले आहे. १७ फेब्रुवारीपासून देशभरात सुरू झालेला हा नाट्यमहोत्सव आता मुंबईत रंगेल. ‘मैत्रीचा ध्वज’ अशी या महोत्सवाची संकल्पना आहे.
- राज चिंचणकर
मुंबई : नॅशनल स्कूल आॅफ ड्रामा (एन.एस.डी.) अर्थात नवी दिल्ली येथील राष्ट्रीय नाट्य विद्यालयाने २४ मार्च ते ७ एप्रिलदरम्यान ८व्या ‘थिएटर आॅलिम्पिक्स’चे आयोजन मुंबईत केले आहे. १७ फेब्रुवारीपासून देशभरात सुरू झालेला हा नाट्यमहोत्सव आता मुंबईत रंगेल. ‘मैत्रीचा ध्वज’ अशी या महोत्सवाची संकल्पना आहे.
देशातील १७ शहरांत आयोजित या महोत्सवात बहुभाषिक नाटकांचे ४५० प्रयोग आयोजित केले आहेत. एकूण २५ हजारांहून अधिक कलावंतांचा यात सहभाग आहे. भारतातील इतर काही ठिकाणी सादर झालेला हा महोत्सव आता मुंबई नगरीत होणार आहे. मुंबईच्या रवींद्र नाट्य मंदिराचे मुख्य नाट्यगृह, तसेच मिनी थिएटर आणि नेहरू सेंटर या ठिकाणी महोत्सवव भरणार आहे. मुंबईतील या महोत्सवाच्या अंतर्गत जागतिक स्तरावरचे एकूण २८ प्रयोग रंगणार आहेत. मोहे पिया, सोनाटा, फेरा आदी प्रयोगांना यात विशेष निमंत्रित करण्यात आले आहे. तसेच आॅस्ट्रेलिया, बेल्जियम, चीन आदी देशांतील ८ आंतरराष्ट्रीय प्रयोग यात होणार आहेत. तसेच काही चर्चासत्रांचे आयोजनही यात करण्यात आले आहे. या संपूर्ण महोत्सवाची सांगता ८ एप्रिल रोजी मुंबईत होणार आहे.
संवाद साधता येणार : जितकी विविधता भारतीय नाटकांमध्ये आहे, तितकी जगाच्या कुठल्याही थिएटरमध्ये नाही. भारतीय नाट्यक्षेत्रात अशा प्रकारच्या महोत्सवाचे आयोजन कधीही झालेले नाही. या महोत्सवाच्या निमित्ताने भारतीय नाटक वैश्विक स्तरावर जाऊन पोहोचेल. जगातील नाट्यकर्मींशी या महोत्सवाच्या आयोजनातून संवाद साधता येईल.
- प्रा. वामन केंद्रे (संचालक, नॅशनल स्कूल आॅफ ड्रामा)