अश्लील पोस्टर प्रकरणी थिएटर मालकाची सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 02:17 AM2017-12-27T02:17:40+5:302017-12-27T02:17:42+5:30
मुंबई: चित्रपटगृहाच्या बाहेर एका चित्रपटाचे अश्लील पोस्टर लावल्याबद्दल गुन्हा नोंदविण्यात आलेल्या चित्रपटगृह मालकाची दंडाधिकारी न्यायालयाने काही दिवसांपूर्वी सुटका केली.
मुंबई: चित्रपटगृहाच्या बाहेर एका चित्रपटाचे अश्लील पोस्टर लावल्याबद्दल गुन्हा नोंदविण्यात आलेल्या चित्रपटगृह मालकाची दंडाधिकारी न्यायालयाने काही दिवसांपूर्वी सुटका केली.
‘शार्क का आतंक’ या चित्रपटाचे अश्लील पोस्टर चित्रपटगृहाबाहेर लावल्याने, इंपिरियल चित्रपटगृहाच्या मालकावर गुन्हा नोंदविण्यात आला. मात्र, दंडाधिकारी व्ही. आर. दास्री यांनी त्याची सुटका केली. सेन्सॉर बोर्डानेच या चित्रपटाला मंजुरी दिल्यानंतर, त्याचे पोस्टर लावण्यात काहीही बेकायदा नाही. ज्या चित्रपटाला बंदी नाही, तो चित्रपट दाखविणे किंवा त्याचे पोस्टर लावणे, गुन्हा नाही, असे न्यायालयाने म्हटले.
गिरगावमधील इंपिरिअल चित्रपटगृहाच्या मालकावर भारतीय दंडसंहिता २९२ अंतर्गत गुन्हा नोंदविला. सरकारी वकिलांच्या म्हणण्यानुसार, या पोस्टरमुळे रस्त्यावर वाहतूककोंडी होत आहे. हे पोस्टर पाहण्यासाठी लोक गाड्या थांबवितात.
सोमनाथ पडसाळकर यांनी यासंदर्भात डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. त्यांच्या तक्रारीनंतर पोलीस उपनिरीक्षकांनी चित्रपटगृहाला भेट दिली. त्यांनी पोस्टर ताब्यात घेत साक्षीदारांचे जबाबही नोंदविले.
सरकारी वकिलांच्या म्हणण्यानुसार, हे चित्रपटगृह मुख्य रस्त्यावरच असल्याने, पोस्टर पाहण्यासाठी लोक मुख्य रस्त्यावरच गर्दी करायचे. कधी-कधी तर संपूर्ण रस्ताच बंद व्हायचा. मात्र, दंडाधिकाºयांनी त्यांचा हा युक्तिवाद फेटाळला. ‘कायद्यानुसार, सेन्सॉर बोर्डाकडून परवानगी घेतल्याशिवाय कोणताही चित्रपट प्रदर्शित होऊ शकत नाही. जर चित्रपटगृह मालकाने ‘शार्क का आतंक’चे मोठे पोस्टर लावले, याचा अर्थ या चित्रपटाला बोर्डाने बंदी घातलेली नाही. लोक हा चित्रपट पाहू शकतात. त्यामुळे या चित्रपटाचे पोस्टर बेकायदेशीररीत्या लावण्यात आले, असे म्हणता येत नाही,’ असे दंडाधिकाºयांनी मालकाची सुटका करताना म्हटले.