सीताराम कुंभार यांना 'रंगभूमी सेवा पुरस्कार'
By संजय घावरे | Published: November 9, 2023 07:45 PM2023-11-09T19:45:06+5:302023-11-09T19:45:20+5:30
Mumbai: पारिजात मुंबईच्या वतीने माहिम येथील न्यू म्युनिसिपल स्कूलमध्ये मराठी रंगभूमी दिन सोहळा साजरा करण्यात आला. आविष्काराच्या सौज्यन्याने आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यात ज्येष्ठ रंगमंच कलाकार सीताराम कुंभार यांना रंगभूमी सेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
मुंबई - पारिजात मुंबईच्या वतीने माहिम येथील न्यू म्युनिसिपल स्कूलमध्ये मराठी रंगभूमी दिन सोहळा साजरा करण्यात आला. आविष्काराच्या सौज्यन्याने आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यात ज्येष्ठ रंगमंच कलाकार सीताराम कुंभार यांना रंगभूमी सेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
मराठी रंगभूमी दिन दिनाचे औचित्य साधत पारिजातच्या वतीने दरवर्षी रंगभूमीची प्रदीर्घ काळ सेवा करणाऱ्या कलावंतांना 'रंगभूमी सेवा पुरस्कार' प्रदान करण्यात येतो. यंदाचा पुरस्कार नाट्यसृष्टीमध्ये कुंभारमामा म्हणून परिचयाचे असलेल्या ज्येष्ठ रंगमंच कलाकार सीताराम कुंभार यांना प्रदान करण्यात आला. लेखक-दिग्दर्शक दीपक राजाध्यक्ष यांच्या हस्ते कुंभार यांना सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी बोलताना राजाध्यक्ष यांनी कुंभार यांच्या कारकीर्दीचा थोडक्यात आढावा घेतला. मागील ३५ वर्षांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी बऱ्याच महत्त्वपूर्ण नाटकांचे नेपथ्य निर्माण आणि रंगमंच व्यवस्थापनाचे काम केले आहे.
कुंभार यांची पुरस्कारासाठी निवड करण्यामागचे प्रयोजन स्पष्ट करताना पारिजातचे स्वप्नील पाथरे म्हणाले की, पडद्यामागे बॅक स्टेज आर्टिस्ट जेव्हा सगळे काही व्यवस्थित सांभाळत असतात, तेव्हा फ्रंट स्टेजला आर्टिस्ट आणि इतर मंडळी चमकत असतात. याच कारणामुळे बॅक स्टेज आर्टिस्टचे रंगभूमीसाठी योगदान खूप महत्त्वाचे आहे. त्यांची योग्य दखल घेतली गेली पाहिजे असेही पाथरे म्हणाले. यापूर्वी सुहास भालेकर, दादा परसनाईक, जयंत सावरकर, कमल शेडगे, सतीश पुळेकर, अतुल पेठे, ओमप्रकाश चव्हाण, किशोर प्रधान, जयंत पवार, दत्ता भाटकर रंगभूमी सेवा पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने अपूर्वा कदमने 'प्रियांका' नाटकाचा प्रयोग सादर केला.