पहिली घंटा वाजवण्याचा मान रंगमंच कामगाराला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 05:45 AM2018-06-10T05:45:24+5:302018-06-10T05:45:24+5:30

९८वे अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलन १३ जूनपासून मुलुंडमध्ये सुरू होत आहे. नाट्यसंमेलन हे नाट्यरंगकर्मींचे गेटटुगेदर आहे.

Theater Worker News | पहिली घंटा वाजवण्याचा मान रंगमंच कामगाराला

पहिली घंटा वाजवण्याचा मान रंगमंच कामगाराला

googlenewsNext

- अजय परचुरे
मुंबई  - ९८वे अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलन १३ जूनपासून मुलुंडमध्ये सुरू होत आहे. नाट्यसंमेलन हे नाट्यरंगकर्मींचे गेटटुगेदर आहे. पण अतापर्यंत रंगमंच कामगार या नाट्यसंमेलनापासून काहीसा लांबच होता. मात्र नाट्य परिषदेने यंदा मुलुंड नाट्यसंमेलनाच्या तयारीची धुरा कुठल्याही इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीला न देता रंगमंच कामगारांवर सोपवली आहे. इतकेच नाहीतर, नाट्यसंमेलनाच्या सुरुवातीला वाजणारी पहिली घंटा द्यायचा मानही रंगमंच कामगारालाच दिला आहे. त्यानुसार ज्येष्ठ रंगमंच कामगार उल्हास सुर्वे हे यंदाच्या नाट्यसंमेलनाची पहिली घंटा वाजवणार आहेत.
सोहळा म्हटले की आजकाल इव्हेंट मॅनेजमेंट आलेच. मात्र, नाट्य परिषदेने मुलुंडच्या नाट्यसंमेलनात लागणारे साऊंड, लाईट, पॅसेजमधील नेपथ्य व्यवस्था, मुख्य रंगमंच, उद्घाटन आणि समारोप सोहळा यासाठी कोणत्याही इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीला काम दिलेले नाही. तर, ते बॅकस्टेजवाल्यांना दिले आहे. मुलुंडच्या कालिदास नाट्यगृहातील मुख्य रंगमंचापासून कोपरा अन् कोपरा सजवण्यापासून ते तेथे उत्तम प्रकारची ध्वनियोजना करण्याचे काम पहिल्यांदाच बॅकस्टेज आर्टिस्ट म्हणजे रंंगमंच कामगारांकडे सोपविण्यात आल्याने त्यांना अत्यानंद झाला
आहे.
दरवेळी नाट्यसंमेलनापासून काहीसा अलिप्त असणारा रंगमंच कामगार आपल्या घरी एखादे मंगलकार्य घडावे त्याप्रमाणे तयारीला लागला आहे. नाट्यसंमेलन यशस्वी करण्यासाठी मराठी रंगभूमीवर २५० रंगमंच कामगार अहोरात्र मेहनत करीत आहेत. त्यासाठीची जोरदार तयारी त्यांनी सुरू केली आहे. ज्येष्ठ रंगमंच कामगार उल्हास सुर्वे यांना नाट्यसंमेलनाची पहिली घंटा वाजविण्याचा मान मिळाल्याचा आनंद सर्व कामगारांमध्ये पाहायला मिळत आहे.
रंगमंच कामगार संघटना गेली कित्येक वर्षे मराठी रंगभूमीवर कार्यरत आहे. या संघटनेचे अध्यक्ष रत्नकांत जगताप यांनी सर्व रंगमंच कामगारांना एकजुटीने बांधून ठेवले आहे. या रंगमंच कामगारांनी भले मोठे इव्हेंट केले नसतील; पण भले भले
इव्हेंट करण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे. त्यामुळे त्यांच्यावर दिलेली जबाबदारी ते चोख पार पाडतील, असा विश्वास जगताप यांना
आहे.

कामाचे चीज झाले
मी आतापर्यंत रंगभूमीवर केलेल्या कामाचे चीज झाले आहे. नाट्यसंंमेलनात माझ्या हातून घंटा वाजवून श्रीगणेशा केला जातोय हा मी माझा सन्मान समजतो. रंगमंच कामगार हे नाटकाचे अविभाज्य घटक आहेत; आणि त्या रंगमंच कामगाराच्या हस्ते घंटा दिली जातेय हे अवर्णनीय आहे.
- उल्हास सुर्वे, ज्येष्ठ रंगमंच कामगार

पहिल्यांदाच सहभागी होता येणार
नाट्यसंमेलनात रंगमंच कामगारांना सहभागी होता येत नाही ही दरवर्षीची ओरड असते. कारण त्याच काळात या कामगारांचे ज्यावर पोट आहे त्या व्यावसायिक नाटकांचे प्रयोग सुरू असतात. मात्र या वर्षी संमेलनापूर्वीच नाट्यनिर्माता संघ, नाट्य व्यवस्थापक संघ आणि रंगमंच कामगार संघटनेने एकत्र येत १३ ते १५ जून यादरम्यान कोणत्याही व्यावसायिक नाटकाचे प्रयोग करायचे नाहीत असा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पहिल्यांदाच मराठी रंगभूमीवरील प्रत्येक रंगमंच कामगाराला नाट्यसंमेलनात सहभागी होऊन योगदान देता येणार आहे.

सन्मानाचा क्षण
रंगमंच कामगारांसाठी हा अत्यंत सन्मानाचा क्षण आहे. वर्षभर आम्ही दिवसरात्र रंगमंचावर राबत असतो. मात्र आपल्या हक्काच्या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळत नाही. ती यंदा मिळतेय. यापेक्षा दुसरा चांगला योग नाही.
- सदानंद कोरगांवकर, रंगमंच कामगार

मोठी पर्वणी
आम्ही सर्वांनी मिळून हा निर्णय घेतला की नाट्यसंमेलन काळात कोणताही नाट्यप्रयोग करायचा नाही. जेणेकरून आम्हाला नाट्यसंमेलनात भाग घेता येईल. दिग्गज तंत्रज्ञांना भेटता येईल. त्यांच्याकडून आम्हालाही काही शिकता येईल आणि हीच आमच्यासाठी मोठी पर्वणी आहे.
- किशोर वेल्हे, रंगमंच कामगार

Web Title: Theater Worker News

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.