नाट्यगृहांचे व्हावे नंदनवन...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2023 12:30 PM2023-12-31T12:30:23+5:302023-12-31T12:30:54+5:30

केवळ कलाकारांनाच नव्हे तर प्रेक्षकांनाही नाट्यगृहांतील अनेक गैरसोयींचा सामना करावा लागतो. या मालिकेच्या निमित्ताने या सगळ्यावर रंगकर्मींना व्यक्त होता आले. शासन दरबारी याची दखल घेतली जाऊन नाट्यगृहांचे नंदनवन करण्यासाठी नव्या वर्षात प्रयत्न केले जातील, ही अपेक्षा...

Theaters should become paradise | नाट्यगृहांचे व्हावे नंदनवन...

नाट्यगृहांचे व्हावे नंदनवन...

मुंबई : ‘लोकमत’च्या व्यासपीठावरून मुंबई आणि परिसरातील नाट्यगृहांच्या समस्यांवर झगझगीत प्रकाश टाकण्यात आला. ‘नाट्यगृहांची परवड’ या वृत्तमालिकेच्या निमित्ताने प्रख्यात अभिनेते, अभिनेत्री, दिग्दर्शक, लेखक, निर्माते यांनी नाट्यगृहांमधील विदारक अंतरंग पोटतिडकीने मांडले. केवळ कलाकारांनाच नव्हे तर प्रेक्षकांनाही नाट्यगृहांतील अनेक गैरसोयींचा सामना करावा लागतो. या मालिकेच्या निमित्ताने या सगळ्यावर रंगकर्मींना व्यक्त होता आले. शासन दरबारी याची दखल घेतली जाऊन नाट्यगृहांचे नंदनवन करण्यासाठी नव्या वर्षात प्रयत्न केले जातील, ही अपेक्षा...

“नाट्यगृहांची परवड’ वृत्त मालिकेवर कलाकारांच्या प्रतिक्रिया
आदर्श थिएटर अद्याप बांधायचे बाकी 
वृत्तमालिकेद्वारे नाट्यगृहांच्या सद्यस्थितीवर प्रकाश टाकल्याबद्दल ‘लोकमत’चे अभिनंदन! साहित्य, नाटक, सिनेमासाठी उभारलेल्या इमारती कलाकार आणि प्रेक्षकांना किती सोयीस्कर व पोषक वातावरण निर्मिती तयार करतात, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आपल्याकडे अद्यापही आदर्शवत थिएटर बांधायचे बाकी आहे. मोठे नाट्यगृह, छोटे नाट्यगृह आणि एक्झिबिशन हॉलचा समावेश असलेली कला जंक्शन्स बनवायला हवीत. 
 - प्रा. वामन केंद्रे, दिग्दर्शक

‘दामोदर’च्या पाडकामाचे दु:ख 
‘लोकमत’ने सुरू केलेल्या ‘नाट्यगृहांची परवड’ मालिकेचे कौतुक वाटते. प्रत्येक कलाकाराने एका नाट्यगृहाबद्दल बोलायचे, ही गोष्ट मला भावली. मी लालबाग-परळमधील असल्याने माझ्यासारख्या एकांकिका स्पर्धेतून पुढे आलेल्या कलाकारासाठी दामोदर हॉल अत्यंत महत्त्वाचा आहे. आज ते नाट्यगृह तोडण्यात आल्याचे दु:ख मी शब्दांत सांगू शकणार नाही. पुनर्विकास करताना नाट्यगृहालाही जागा द्यावी, ही विनंती. 
- सिद्धार्थ जाधव, अभिनेता

दुरवस्थेचे दुष्टचक्र 
लवकर संपावे
आज सर्वच नाट्यगृहांची परिस्थिती अत्यंत भयानक आहे. महाराष्ट्रातील कोणत्या नाट्यगृहाबाबत चांगले बोलायचे, याबाबत संभ्रम निर्माण होतो. यासाठी आम्ही सर्व कलावंत खूप वर्षे झाली संघर्ष करत आहोत. कोणी वैयक्तिकरीत्या, तर काही संघटितरीत्या आपले गाऱ्हाणे मांडत आहेत. पण त्याकडे कोणाचेच लक्ष नाही. कोणताही तोडगा निघत नाही. नाट्यगृहांच्या दुरवस्थेचे दुष्टचक्र लवकर सुटावे, ही रंगदेवतेच्या चरणी इच्छा आहे.
- विजय पाटकर, अभिनेता

नाट्यगृहांची 
अवस्था भयानक 
‘नाट्यगृहांची परवड’ने कलाकार आणि प्रेक्षकांच्या मनातील प्रश्न मांडले आहेत. ‘लोकमत’च्या या कामाचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे. नाट्यगृह उत्तम स्थितीत असायलाच हवीत. उर्वरित महाराष्ट्रातील नाट्यगृहांची अवस्थाही अत्यंत भयानक आहे. पुण्यातील बालगंधर्व स्वच्छतागृह अत्यंत अस्वच्छ असते. जास्तीत जास्त प्रेक्षकांनी नाटक पाहायला यावे, असे वाटत असल्यास नाट्यगृहाचे भाडे कमी असायला हवे. 
- अंशुमन विचारे, अभिनेता

हे आणखी किती काळ भोगायचे? 
सरसकट सर्वच नाट्यगृहांमध्ये आणि विशेषत: महिला कलावंतांसाठी असलेली स्वच्छतागृहे स्वच्छ नसतात. नैसर्गिक विधींचा त्रास सहन करून कलावंतांनी आपली कला कशी सादर करायची? हे आणखी किती काळ भोगायचे? ही फार मोठी गोष्ट नाही. अत्यंत मूलभूत गरज आहे. सर्वच नाट्यगृहांत कलाकारांना आवाजासाठी लेपल माइकचा वापर करावा लागतो. अनेक छोट्या गोष्टींची पूर्तता केली तरी प्रेक्षक गर्दी करतील. 
- विजय कदम, अभिनेता

लावणीला सावत्र वागणूक नको
पुण्यातील मोठे नाट्यगृह असलेल्या बालगंधर्वमध्ये बाहेरून येणाऱ्या निर्माता-कलाकारांसाठी राहण्याची सोय नाही. बालगंधर्वच्या इमारतीमध्ये वरच्या मजल्यावर राहण्याची सोय असूनही कलाकारांना राहण्याची परवानगी दिली जात नाही. जाणूनबुजून पाणी बंद केले जाते. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी विचारांच्या राज्यात अशा प्रकारच्या गोष्टी होणे हे अत्यंत लज्जास्पद आहे. लावणीला सावत्र वागणूक दिली जाऊ नये, ही विनंती.  
- हेमलता बाणे, अभिनेत्री

प्रेक्षकांच्या मनातले 
‘लोकमत’ची ‘नाट्यगृहांची परवड’ ही मालिका अतिशय उत्तम आहे. ५०० रुपये तिकीट घेऊनसुद्धा किमान गरजेच्या गोष्टी नाट्यगृहात मिळणार नसतील, तर मग पुढील पिढी नाटक बघावयास कशी येणार? हा प्रश्न आहे. या मालिकेतून काहीतरी बोध घेऊन नाट्यगृहात सुधारणा होण्याची आशा वाटते.
- सौ. सुप्रिया चिटणीस, माहीम

‘लोकमत’ची वृत्तमालिका सरकार आणि नाट्यगृहांचे व्यवस्थापन पाहणाऱ्यांच्या डोळ्यांत अंजन घालणारी आहे. वैभव मांगले यांनी  प्रेक्षकांच्या मनातील गोष्टी मांडल्या. ‘गडकरी’ नाटक पाहण्यात वेगळीच मजा येते. सिनेमापेक्षा नाटक पाहणे हा वेगळा अनुभव असतो. नाट्य रसिक नाट्यगृहांकडे वळत आहे, पण तो टिकवून ठेवणे गरजेचे आहे. 
- सुहास सावंत, करी रोड

कोरोनानंतर रसिकराजा पुन्हा नाटक पाहण्यासाठी नाट्यगृहांमध्ये गर्दी करत आहे. त्यांना योग्य सोयीसुविधा दिल्या नाहीत तर ते नाटकांकडे पाठ फिरवतील. ‘लोकमत’ने याकडे लक्ष वेधले आहे. काही नाट्यगृहांची अवस्था खूपच खराब आहे. नाटकासाठी लवकर येणाऱ्या प्रेक्षकांची गैरसोय होणार नाही याची व्यवस्थापनाने काळजी घ्यावी. 
    - गणेश तळेकर, माटुंगा
 

Web Title: Theaters should become paradise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Theatreनाटक