राज चिंचणकर मुंबई : प्रजासत्ताक दिनाच्या सुट्टीचे औचित्य साधून मुंबई आणि परिसरातील सर्वच नाट्यगृहांत तिन्ही प्रहर मराठी नाटकांचे धडाक्यात प्रयोग लावण्यात आले आहेत. त्यामुळे या दिवशी मराठी रंगभूमीवर नाट्यप्रयोगांचा वर्षाव होत आहे. सर्वच नाट्यगृहे नाट्यप्रयोगांनी ‘हाउसफुल्ल’ झाली आहेत. साहजिकच, २६ जानेवारीचा शुक्रवार फक्त मराठी नाटकांचाच ठरणार आहे.सार्वजनिक सुट्टी आली की, नाटकांचे प्रयोग मोठ्या प्रमाणावर लावले जातात. या वेळी तर हक्काचा ‘वीकेंड’ आला आहे. त्यामुळे नाट्यरसिकही नाट्यगृहांच्या पायºया उत्साहाने चढतील, अशी अपेक्षा नाट्यवर्तुळातून व्यक्त केली जात आहे. अजून एक कारण म्हणजे, ‘पद्मावत’ या बहुचर्चित हिंदी चित्रपटाने एकूणच चित्रपटगृहांवर ‘करणी’ केल्याने, २६ जानेवारीच्या शुक्रवारी एकही मराठी चित्रपट प्रदर्शित करण्यास कुणी धजावलेले नाही. परिणामी, मराठी रसिकांची मदार केवळ नाटकांवरच असेल.शिवाजी मंदिर, यशवंत नाट्यगृह, दामोदर नाट्यगृह अशा शहरातील मुख्य नाट्यगृहांसह, उपनगरातील दीनानाथ, प्रबोधनकार ठाकरे व कालिदास नाट्यगृह अशा ठिकाणी मिळून सकाळ, दुपार व रात्रीचे नाटकांचे प्रयोग लावण्यात आले आहेत. ठाण्याचे गडकरी रंगायतन व डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, डोंबिवलीचे सावित्रीबाई फुले नाट्यमंदिर, वाशीचे विष्णुदास भावे नाट्यगृह, पनवेलचे क्रांतिवीर वासुदेव फडके नाट्यगृह या ठिकाणीही नाटकांचे दणक्यात प्रयोग जाहीर करण्यात आले आहेत.साखर खाल्लेला माणूस, गेला उडत, ढाई अक्षर प्रेम के, स्टॅच्यू आॅफ लिबर्टी, यादों की वरात, अनन्या, अशीही श्यामची आई, शुभदंगल सावधान, अमर फोटो स्टुडिओ, देवबाभळी, के दिल अभी भरा नहीं, डोन्ट वरी बी हॅपी, तोच परत आलाय, अपराध मीच केला, सर्किट हाउस अशा नव्या आणि जुन्या नाटकांचा मिलाफ असलेले नाट्यप्रयोग २६ जानेवारी रोजी रसिकांच्या दरबारात एकत्र हजर होत आहेत. या दिवशी इतक्या मोट्या संख्येने होणाºया प्रयोगांमुळे तमाम नाट्यगृहे तर ‘हाउसफुल्ल’ झाली आहेतच. आता नाट्यरसिकही या नाटकांना ‘हाउसफुल्ल’ गर्दी करतात का? याकडे नाट्यसृष्टीचे लक्ष लागून राहिले आहे.
नाट्यगृहे ‘हाउसफुल्ल’ :आजचा दिवस ठरणार मराठी नाटकांचा! प्रजासत्ताक दिनी नाट्यप्रयोगांचा वर्षाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2018 2:45 AM