रेल्वे प्रवासात दररोज ८० मोबाइलची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2020 05:12 AM2020-03-01T05:12:32+5:302020-03-01T05:12:36+5:30
उपनगरी रेल्वे प्रवासात दररोज प्रवाशांचे ७० ते ८० मोबाइल चोरी होण्याची नोंद केली जात आहे.
मुंबई : उपनगरी रेल्वे प्रवासात दररोज प्रवाशांचे ७० ते ८० मोबाइल चोरी होण्याची नोंद केली जात आहे. मात्र यातील रेल्वे पोलिसांकडून दिवसाला केवळ २ ते ३ मोबाइल शोधले जातात. काही वेळेस मोठ्या गुन्ह्याची उकल झाल्यास १० ते १२ मोबाइलचा शोध पोलिसांना लावणे शक्य होते.
उपनगरी लोकलमधून प्रवास करताना गर्दीचा फायदा घेऊन मोबाइल चोरीच्या घटना घडतात. मागील दोन वर्षांत मोबाइल चोरीच्या एकूण ५६ हजार १९८ घटनांची नोंद करण्यात आली आहे. यापैकी ४ हजार ६२८ मोबाइल चोरीच्या घटनांची उकल करण्यात आली आहे.
उपनगरी रेल्वेमधून १ जानेवारी २०१३ पासून ते डिसेंबर २०१८ पर्यंत एकूण ५९ हजार ९०४ मोबाइल चोरीच्या घटना घडल्या आहेत. यामधील फक्त ८ हजार ८६८ मोबाइल सापडले. जानेवारी ते डिसेंबर २०१८ या वर्षात ३२ हजार ४७६ मोबाइल चोरीला गेल्याची नोंद आहे. मात्र यात फक्त २ हजार ५१७ गुन्ह्यांची उकल झाली आहे. तर, जानेवारी ते डिसेंबर २०१९ या कालावधीत २३ हजार ७२२ मोबाइल चोरी झाले असून, त्यापैकी २ हजार १११ मोबाइल चोरीच्या घटनांची उकल केली आहे. प्रत्येक रेल्वे स्थानकात मोबाइल चोरीच्या घटना घडत आहेत. मात्र बोरीवली, कल्याण, ठाणे, कुर्ला आणि वडाळा या रेल्वे पोलीस ठाण्यात सर्वाधिक मोबाइल चोरीच्या घटना घडत आहेत.
चोरी गेलेल्या मोबाइलच्या घटनेच्या माहितीची नोंद केल्यावर पोलिसांद्वारे मोबाइल ट्रॅकिंगवर टाकला जातो. मात्र खूप कमी मोबाइल ट्रॅक होतात. चोरीला गेलेले मोबाइल देशातील इतर राज्यात आणि नेपाळ देशात विकले जात आहेत. हे मोबाइल शोधण्यासाठी रेल्वे पोलिसांच्यावतीने विशेष पथकाची फौज तयार केली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
>चोरीच्या ५६,१९८ घटना
मागील दोन वर्षांत मोबाइल चोरीच्या ५६,१९८ घटनांची नोंद झाली. यापैकी ४,६२८ मोबाइल चोरीच्या घटनांची पोलिसांकडून उकल करण्यात आली आहे.