मुंबई : मुलीच्या शिक्षणासाठी बँकेत दागिने गहाण ठेवून मिळालेल्या रकमेवर ठगांनी हात साफ केला. गुरुवारी दहिसरमध्ये ही घटना घडली. दहिसर पोलिसांनी गुन्हा दाखल करत, अधिक तपास सुरू केला आहे.तक्रारदार दर्शना वराडकर (४५) या दहिसरच्या कोकणीपाडा परिसरात राहतात. त्या घरकाम करतात. १४ वर्षांच्या मुलीसह त्यांना ११ वर्षांचा मुलगा आहे. मुलीचे दहावीचे वर्ष असल्याने, तिला खासगी शिकवणी लावण्यासाठी त्यांनी पैसे जमविण्यास सुरुवात केली. त्यांनी घरातील सोने गहाण ठेवून बँकेतून कर्ज घेण्याचे ठरवले. २० तारखेला दहिसर येथील बँकेत त्या पतीसह सोने घेऊन गेल्या. बँकेने त्यांना ७४ हजार रुपये देण्याचे मान्य केले. मंगळवारी त्यांनी ठरल्याप्रमाणे सोने बँकेत दिले. पैसे घेऊन ते पिशवीत ठेवले. ते बाहेर निघणार तोच एका व्यक्तीने त्यांच्याकडून पेन मागितला. त्यांच्या पतीने त्यांना पेन दिला. थोड्या वेळाने अनोळखी व्यक्तीने पेन परत करत, नोटा व्यवस्थित तपासून घेतल्या ना, असे विचारले. कारण अनेकदा नोटांना कलर असतो आणि त्या नोटा कोणीही घेत नाही.’ असे म्हणत द्या मी तपासून देतो, असे तो व्यक्ती म्हणाला. त्यांच्या पतीनेही त्याच्यावर विश्वास ठेवून नोटा तपासण्यासाठी दिल्या. त्यातील ४ नोटा वेगळ्या काढून या नोटांना कलर लागल्याचे सांगून ठगाने पळ काढला.वराडकर यांनी नोटा पाहिल्या व त्यांना कलर लागला नसल्याचे दिसून आले. त्यांनी तसेच घर गाठले. सायंकाळी पैसे तपासले असता त्यात ३८ हजार रुपये कमी असल्याचे समजताच त्यांना धक्काच बसला. आरोपी हातसफाईने नोटा काढून पसार झाला.यात फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी गुरुवारी बँकेत धाव घेतली. बँकेच्या व्यवस्थापकाला घडलेला प्रकार सांगून बँकेचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सांगितले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये ठगाची हातसफाई कैद झाली. अखेर, त्यांनी त्याच फुटेजच्या आधारे दहिसर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून दहिसर पोलिसांनी अनोळखी दोन व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मुलीच्या शिक्षणासाठी दागिने गहाण ठेवून घेतलेल्या कर्जाच्या रक्कमेची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 6:18 AM