मुंबई : नौदलाच्या ७० वर्षीय निवृत्त अधिका-याच्या सेवेसाठी ठेवलेल्या केअरटेकरनेच चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार पवईत उघडकीस आला आहे. या प्रकरणी पवई पोलिसांनी अल्पवयीन केअरटेकरला ताब्यात घेतले आहे.पवईतील जलवायू विहारमध्ये प्रमोदकुमार जग्गी (७०) हे पत्नी गुरदीप (७०) आणि मुलगा गौरव (४०) यांच्यासोबत राहतात. ते भारतीय नौदलातील सेवानिवृत्त अधिकारी आहेत. त्यांचा मुलगा हा प्रॉपर्टी डीलर आहे. जग्गी यांच्या सेवेसाठी त्यांनी विक्रोळीच्या जाक्टर हेल्थ केअर या कंपनीचे डायरेक्टर निधी शर्मा, अनिलकुमार खांडेलवाल, सुधा काश्मिरी आणि दिनेश पेंडणेकर यांच्याकडून केअरटेकर म्हणून १७ वर्षांच्या मुलाला ठेवले होते. तो गेल्या १० दिवसांपासून तेथे काम करतो. तो सकाळी साडे आठ ते रात्री साडे आठपर्यंत काम करतो. याच दरम्यान जग्गी यांच्या पत्नीच्या पाकिटातून ११ एप्रिल रोजी २ हजार रुपये गायब झाल्याचे निदर्शनास आले. त्यांनी ही बाब मुलाला सांगितली. मात्र त्याने दुर्लक्ष केले. १५ एप्रिल रोजी गुरमीत या भाजी आणण्यासाठी बाजारात निघाल्या. त्याचदरम्यान पाकिटातील हजार रुपये गायब असल्याचे निदर्शनास आले. गौरवला केअरटेकर म्हणून ठेवलेल्या मुलावर संशय आला. त्यांनी मुलाच्या हालचालींवर लक्ष ठेवले. त्यानंतर गुरुवारी गुरमीत यांच्या पाकिटातून पुन्हा बाराशे रुपये चोरीला गेले. त्यामुळे मुलाने थेट केअरटेकर मुलाकडे चौकशी केली. सुरुवातीला त्याने नकार दिला. मात्र त्याला विश्वासात घेत विचारणा करताच, त्यानेच पैसे चोरल्याची कबुली दिली.यापूर्वी ठेवण्यात आलेला केअरटेकर राजेंद्र बावकरनेही चोरी केली होती. तेव्हा त्याला समज देत गौरव यांनी त्याला कामावरून काढले होते. त्यामुळे गौरव याने अल्पवयीन मुलासह कंपनीविरुद्धही पवई पोलीस ठाण्यात तक्रार दिली. गौरव यांच्या तक्रारीवरून पवई पोलीस अधिक तपास करीत आहेत. त्यांनी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेत त्याची रवानगी बालसुधारगृहात केली आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती पवई पोलिसांनी दिली.
नौदलाच्या निवृत्त अधिकाऱ्याच्या घरात केअर टेकरकडून चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 12:38 AM