नशा करण्यासाठी एसीमधील तांब्याच्या वायर्सची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:05 AM2021-03-17T04:05:28+5:302021-03-17T04:05:28+5:30
सांताक्रुझच्या सीआयडी कॉलनीतील प्रकार; तेवीस वर्षीय तरुणाला अटक लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : नशा करण्यासाठी सीआयडी ऑफिसर्सच्या कॉलनीतील एअर ...
सांताक्रुझच्या सीआयडी कॉलनीतील प्रकार; तेवीस वर्षीय तरुणाला अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : नशा करण्यासाठी सीआयडी ऑफिसर्सच्या कॉलनीतील एअर कंडिशनरमधील तांब्याच्या वायर्सची चोरी करणाऱ्या तरुणाला सोमवारी सांताक्रुझ पाेलिसांनी अटक केली. मार्शल मायकल जेकब असे त्याचे नाव आहे.
जेकबला नशेचे व्यसन आहे. तपास अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीत तो इमारतीवर चढून नंतर एसीच्या बाहेरील भागातील वायर्स कापायचा. त्या जमा करून २०० ते ३०० रुपयांना विकायचा. यातून मिळणाऱ्या पैशांतून नशेचे पदार्थ विकत घ्यायचा. सांताक्रुझमधील सीआयडी कॉलनीतील रहिवासी अधिकारी अमर पाल यांनी त्यांच्या एसीमध्ये महागातील वायर्स लावल्या होत्या. ज्याची किंमत १० हजार रुपये हाेती. त्या चाेरीला गेल्याने त्यांनी सांताक्रुझ पाेलिसांत तक्रार दाखल केली. त्यानुसार तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक योगेश पवार यांनी तपास सुरू करून सीसीटीव्ही फूटेज पडताळले. त्यात जेकबने अशाच प्रकारे सहा फ्लॅट आणि परिसरातील एकूण ३० फ्लॅटसच्या वायर्स चोरल्याचे उघड झाले. त्यानुसार त्याला अटक करण्यात आली.
........................