कोरोनामुळे मृत पत्नीचे अखेरचे दर्शन घेऊ दिले नाही म्हणून चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:06 AM2021-05-10T04:06:21+5:302021-05-10T04:06:21+5:30
नाेकराने मालकावर काढला राग; पोलिसांनी बिहारमधून घेतले ताब्यात लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पत्नीला अखेरचे भेटू ...
नाेकराने मालकावर काढला राग; पोलिसांनी बिहारमधून घेतले ताब्यात
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पत्नीला अखेरचे भेटू दिले नाही या रागात नोकराने मालकाच्या घरात चोरी केल्याचा प्रकार कांदिवली पोलिसांनी केलेल्या कारवाईतून समाेर आला. याप्रकरणी कांदिवली पोलिसांनी दोघांना अटक केली.
कांदिवलीच्या विश्व मिलन सोसायटीत राहणारे नवीनचंद्र मिस्त्री यांची काळजी घेण्यासाठी त्यांच्या मुलीने श्याम सुंदर यादव नावाच्या व्यक्तीला कामावर ठेवले होते. श्यामच्या भावाचे १५ एप्रिल रोजी लग्न असल्यामुळे तो गावी गेला होता. जाण्यापूर्वी मिस्त्री यांची काळजी घेण्यासाठी त्याचा मित्र अनिल यादवला कामावर ठेवले. दरम्यान, १३ दिवसांनंतर कोरोनामुळे पत्नीच्या मृत्यूची बातमी कानावर पडताच अनिलला धक्का बसला. त्याने मिस्त्रींकडे पत्नीला शेवटचे पाहण्यासाठी घरी पाठविण्याची विनंती केली. पण आजारी असल्याने मिस्त्री यांनी नकार दिला. याच रागात २८ एप्रिल रोजी त्यांच्या घरात चोरी करून अनिलने गाव गाठले.
१ मे रोजी जेव्हा मिस्त्री यांची मुलगी दर्शनी घरी आली, त्यावेळी कपाटाचा दरवाजा उघडा असल्याचे तिने पाहिले. सामान तपासून पाहिले असता घरात ठेवलेले साडेसात लाखांचे सोने-चांदीचे दागिने आणि ४० हजारांची रोकड गायब हाेती. त्यामुळे दर्शनीने कांदिवली पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी तपासाअंती श्याम सुंदर आणि अनिल यांना बिहारच्या दरभंगा जिल्ह्यातून अटक केली. त्यांच्याकडून २ तोळे सोने आणि ३ लाखांची रोकड जप्त केली. सध्या दोघेही पोलीस कोठडीत आहेत.
..............................................