मुंबई : चुनाभट्टीमध्ये पोलिसाच्या घरात चोरी झाल्याची घटना गुरुवारी घडली. यामध्ये जवळपास ४२ हजार ५०० रुपयांच्या ऐवजासह एटीएम कार्ड चोरीला गेले आहे. या प्रकरणी चुनाभट्टी पोलिसांनी अनोळखी इसमाविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.चुनाभट्टी येथील पंचशीलनगर परिसरात अर्जुन रामचंद्र खाडे (५८) हे मुलगा संदीप (२८) आणि पत्नीसोबत राहतात. खाडे हे बेस्टमध्ये नोकरीस आहेत, तर संदीप हा मुंबई पोलीस दलात नोकरी करतो. गुरुवारी रात्री साडेअकराच्या सुमारास त्यांनी ड्रायव्हिंग लायसन्स, बेस्टचे ओळखपत्र, बँकेचे एटीएम, एटीएमचा पिन कोड लिहिलेल्या कागदासह ५ हजार रुपयांची रोकड शर्टाच्या खिशात ठेवली. शर्ट दरवाजामागे लावून ते झोपी गेले. शुक्रवारी सकाळी सव्वाआठच्या सुमारास ते कामावर जाण्यास निघाले. निघताना दरवाजामागे ठेवलेला शर्ट त्यांना दिसून आला नाही. शर्ट गायब झाल्याने पत्नी व मुलाकडून शोध सुरू झाला. मात्र शर्ट मिळाला नाही, तर दुसरीकडे घरातील दागिनेही सापडले नाहीत. ही शोधाशोध सुरू असतानाच, त्यांच्या मोबाइलवर खणाणलेल्या मेसेजने त्यांच्या गोंधळात भर पडली. कारण त्यांच्या चोरीस गेलेल्या एटीएमद्वारे साडेसात हजार रुपये काढल्याचा तो मेसेज होता.त्यामुळे घरात चोरी झाल्याचे समजताच त्यांनी याबाबत चुनाभट्टी पोलिसांना कळविले. घटनेची माहिती मिळताच पोलीस तेथे दाखल झाले. यामध्ये जवळपास ४२ हजारांच्या ऐवजासह त्यांची महत्त्वपूर्ण कागदपत्रे चोरीला गेली आहेत. या प्रकरणी चुनाभट्टी पोलिसांनी अनोळखी इसमाविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
चुनाभट्टीत पोलिसाच्या घरातच झाली चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 2:52 AM