ठाण्यातील सराफाच्या दुकानात दीड कोटीच्या दागिन्यांची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:06 AM2021-01-18T04:06:59+5:302021-01-18T04:06:59+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : शिवाईनगर येथे ‘वारीमाता गोल्ड’ या ज्वेलर्सच्या दुकानातून चोरट्यांनी रविवारी पहाटे दोन ते अडीच वाजण्याच्या ...

Theft of jewelery worth Rs 1.5 crore from a bullion shop in Thane | ठाण्यातील सराफाच्या दुकानात दीड कोटीच्या दागिन्यांची चोरी

ठाण्यातील सराफाच्या दुकानात दीड कोटीच्या दागिन्यांची चोरी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : शिवाईनगर येथे ‘वारीमाता गोल्ड’ या ज्वेलर्सच्या दुकानातून चोरट्यांनी रविवारी पहाटे दोन ते अडीच वाजण्याच्या सुमारास शिरकाव करून एक कोटी ३५ लाखांच्या सोने-चांदीच्या दागिन्यांची लूट केल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला असून, गुन्हे अन्वेषण विभागासह तीन पथके या तपासासाठी नेमल्याची माहिती सुत्रांनी दिली.

परराज्यातील एका व्यक्तीने या ज्वेलर्स दुकानाच्या बाजूचे दुकान दीड महिन्यांपूर्वीच भाड्याने घेतले होते. विशेष म्हणजे या परिसरात १५ ते २० हजार रुपये प्रतिमहिना दुकानाचे भाडे असताना २८ हजारांच्या भाड्यामध्ये हा गाळा देण्यात आला होता. त्यासाठी दीड लाखांची अनामत रक्कम घेण्यात आली होती. मात्र, भाडेकरार करण्यासाठी भाडेकरूंकडून टाळाटाळ केली जात होती. आपला फळांचा व्यवसाय असून, त्यासाठी हा गाळा घेणार असल्याचे त्याने सांगितले होते. या दुकानात तिघांनी ‘अब्दुल फ्रुट्स’ नावाने फळ विक्रीचा व्यवसाय थाटला होता.

या व्यवसायाच्या दिखाव्यासाठी गेल्या महिनाभरापासून त्यांनी फळ विकण्याचाही बनाव केला. तिघे दुकानात, तर त्यांचा चौथा साथीदार हातगाडीवर टेहळणीसाठी फळ विक्री करायचा. शनिवारी रात्री अब्दुल फ्रुट्स आणि ‘वारीमाता गोल्ड’ या दोन्ही दुकानांच्या मध्यभागी आतील बाजूने असलेल्या भिंतीला त्यांनी भगदाड पाडले. तिथूनच आत शिरकाव करून गॅस कटरच्या साहाय्याने सराफाच्या दुकानातील मोठी लोखंडी तिजोरी त्यांनी फोडली. नंतर या तिजोरीतील तसेच दुकानातील एक कोटी २० लाखांचे दोन किलो ४०० ग्रॅम सोन्याचे, तर १५ लाखांच्या ३१ किलो चांदीच्या दागिन्यांची त्यांनी लूट केली. रविवारी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास दुकानाचे मालक मुकेश चौधरी यांनी दुकान उघडले, त्यावेळी हा धक्कादायक प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहायक पोलीस आयुक्त निवृत्ती कदम यांच्यासह वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके, तसेच वर्तकनगर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली.

गाळे भाड्याने देऊ नये...

बोरिवली येथे अलीकडेच एका दुकानाशेजारी असलेल्या फळविक्रेत्याने अशीच सराफाच्या दुकानात चोरी केली होती. अशी टोळी झारखंड भागातील असल्याचे बोलले जाते. त्यामुळे खात्री झाल्याशिवाय, भाडेकराराशिवाय, कोणालाही गाळे किंवा घरे भाड्याने देऊ नयेत, असे आवाहन पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी केली आहे.

Web Title: Theft of jewelery worth Rs 1.5 crore from a bullion shop in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.