Join us

मॅनहोलच्या झाकणाच्या चोरीमुळे वाढली पालिकेची डोकेदुखी; स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2021 8:31 PM

मलःनिसारण वाहिनी स्वच्छ करण्‍यासाठी व नियमित तपासणी करण्यासाठी वाहिनीला ठराविक अंतरावर मॅनहोल आणि त्यावर झाकण दिलेले असतात.

मुंबई - जोगेश्वरी, अंधेरी, विलेपार्ले या परिसरातील मलनिस्सारण वाहिन्यांवरील मॅनहोलची झाकणे चोरीला जाण्याचे प्रकार वाढले आहेत. यामुुळे हैराण झालेल्या पालिका प्रशासनाने आता पोलिसांची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

मलःनिसारण वाहिनी स्वच्छ करण्‍यासाठी व नियमित तपासणी करण्यासाठी वाहिनीला ठराविक अंतरावर मॅनहोल आणि त्यावर झाकण दिलेले असतात. वाहिनी  १५ ते २५ फूट खोल असल्‍यामुळे चांगली सुरक्षितता असावी म्हणून मॅनहोलचे झाकण हे लोखंडी आणि मजबूत स्वरूपाचे असते. एका झाकणाची किंमत अंदाजे बारा हजार रुपये इतकी असते.

मात्र यामुळेच मलःनिसारण वाहिन्यांवरील ही महागडी लोखंंडी झाकणे चोरीला जात आहेत. मागील काही दिवसांपासून के/पूर्व विभागात अंधेरी, विलेपार्ले, जोगेश्वरी परिसरात मिळून अशी सुमारे २० ते २५ झाकणं चोरीला गेलेली आहेत. विशेषतः अंधेरी एमआयडीसी परिसरात अधिक संख्येने झाकणं चोरीला गेली आहेत. या झाकणांची चोरी पहाटेच्या सुमारास करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे.

पालिकेची पोलीस ठाण्यात धाव-

मॅनहोल उघडे राहिल्‍यामुळे त्‍यामध्ये एखादी व्यक्ती पडून अथवा धावत्या वाहनांचे चाक अडकून अपघात होण्‍याची शक्‍यता असते. अशी काही घटना यापूर्वी घडल्या आहेत. यामुळे पालिकेला टीकेचे धनी व्हावे लागत आहे. मॅनहोलवर झाकण नसल्याचे आढळताच नवीन झाकण लावण्यात येते. मात्र, झाकण वारंवार गायब होत असल्याने हा चोरीचा प्रकार असल्याचे लक्षात आले. तसे, संबंधित स्‍थानिक पोलीस ठाण्‍यांना वेळोवेळी पत्राद्वारे देखील कळविण्‍यात आले आहे. 

सीसीटीव्हीद्वारे समोर आली चोरीची घटना-

मॅनहोल झाकण चोरीला जाण्याचे प्रकार सतत वाढत असल्याने संबंधित परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पालिकेने तपासले. त्याआधारे, के/पूर्व विभागातील महापालिका अधिकाऱ्यांमार्फत एम.आय.डी.सी. पोलीस ठाणे व सहार पोलिस ठाणे येथे अज्ञातांविरोधात चोरीचा गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे. 

टॅग्स :मुंबई महानगरपालिका