गौरी टेंबकर, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मालाड पोलिसांनी ई-कॉमर्स कंपनीच्या गोडाऊनमधून मोबाईल चोरणाऱ्या दोन डिलिव्हरी बॉईजना अटक केली आहे. ग्राहकांनी परत केलेले आठ मोबाईल गायब असल्याचे लक्षात येताच व्यवस्थापकाने डिलिव्हरी बॉईजकडे चौकशी केली असता चोरीचा प्रकार उघडकीस आला. मात्र, ते गप्प राहिले आणि अखेर व्यवस्थापकाने २७ ऑक्टोबर रोजी मालाड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
आरोपी मालाड पश्चिमच्या रामचंद्र लेन येथील आशिष उद्योग भवन येथे असलेल्या कंपनीच्या गोडाऊनमध्ये एका ई-कॉमर्स कंपनीसाठी डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत होते. सहायक पोलीस आयुक्त रेणुका बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक रवींद्र अडाणे, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी शिंदे यांनी त्यांच्या तपास पथकासह सीडीआरचा वापर करून गहाळ मोबाईल फोनचा शोध सुरू केला. या पथकाने त्यांच्या आयएमईआय क्रमांकांद्वारे चार मोबाईल फोन यशस्वीरित्या ट्रेस केले आणि काही आठवड्यांपूर्वी मालवणी आणि सायन कोळीवाड्यातून या दोघांना पकडले, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. रमजान सलीम शेख (२३) आणि समीर शफीक मलिक (२६) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
चौकशीदरम्यान, असे उघड झाले की, आरोपींनी त्यांचे बारकोड स्कॅन केल्यानंतर डिलिव्हर न केलेले मोबाइल फोन कंपनीला परत करायचे होते. मात्र फोन परत देण्या ऐवजी त्यांनी ते चोरी करून वैयक्तिक फायद्यासाठी बाजारात विकल्याचा आरोप आहे. पोलिसांनी चार मोबाईल फोन जप्त केले, त्यापैकी काही आरोपींनी विकले होते, तर दोन त्यांच्या कुटुंबातील सदस्य वापरत होते. त्यांची कार्यपद्धती लक्षात घेता, असे दिसते की या दोघांनी यापूर्वी असेच गुन्हे केले असावेत आणि त्यात इतरांचा सहभाग असू शकतो. पोलीस या दृष्टिकोनातून सक्रियपणे तपास करत आहेत. अटक केलेल्या व्यक्तींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले