लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : चोरट्याने वाहतूक पोलिसांचे टोइंग व्हॅन चोरी करून पळ काढला. याबाबत मुंबईसह अन्य पोलिसांना अलर्ट देण्यात आला. त्यानुसार, टोइंग व्हॅनचा शोध सुरू असतानाच या व्हॅनचा कसारा घाटात अपघात झाला आणि आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. याप्रकरणी शिवडी पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.
वडाळा वाहतूक विभागात कार्यरत असलेले पोलिस हवालदार अनिल शिरसाठ यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. तक्रारीनुसार रे रोड येथील पूर्व मुक्त मार्ग येथे हा प्रकार घडला. सायंकाळी सहा ते साडेसहाच्या सुमारास टोइंग व्हॅन गायब झाल्याचे समजताच खळबळ उडाली. तात्काळ सीसीटीव्हीच्या मदतीने शोध सुरू केला. मात्र, घटनास्थळावरील सीसीटीव्ही बंद असल्याचे आढळून आले. वाहनाच्या टायरबाबत काही काम असल्यामुळे वाहन ईस्टर्न फ्री वे परिसरात थांबवण्यात आले होते. याचदरम्यान दोन आरोपी तेथील वाहन घेऊन पसार झाले. पोलिसांनी शोध सुरू केला. दुसरीकडे मंगळवारी पहाटेच्या सुमारास वाहनाचा कसारा घाटात अपघात झाला. यादरम्यान एका आरोपीने पळ काढला, तर दुसरा आरोपी चालक मोनू पंडित उपाध्याय हा स्थानिक कसारा पोलिसांच्या हाती लागला. अपघातानंतर त्याचा साथीदार पळून गेला आहे. मोनू हा मूळचा मध्य प्रदेशातील देवरी येथील रहिवासी असून, शिवडी पोलिसांचे पथक त्याला मुंबईत आणण्यासाठी कसारा येथे गेल्याची माहिती पाेलिसांनी दिली.
मुंबईबाहेर पळून जाण्याचा डाव फसला
- पोलिस वाहनाची चोरी करून आरोपी मुंबईबाहेर पळून जात होता. - मात्र, अपघातामुळे तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला. - आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर त्याची याबाबत चौकशी केली जाईल, तसेच त्याच्या साथीदाराचाही शोध घेतला जाईल, असे अधिकाऱ्याने सांगितले.