चोरी, लूटमारी, दरोड्यात महाराष्ट्र नंबर १
By admin | Published: August 21, 2015 02:06 AM2015-08-21T02:06:48+5:302015-08-21T02:06:48+5:30
सर्वसामान्यांवर थेट आघात करणारे पाकीटमारी, सोनसाखळी चोरी, वाहन चोरी, लूटमार ते सशस्त्र दरोडे असे गंभीर गुन्हे करणाऱ्या संघटित टोळ्या महाराष्ट्र पोलिसांच्या हाताबाहेर गेल्या आहेत
जयेश शिरसाट, मुंबई
सर्वसामान्यांवर थेट आघात करणारे पाकीटमारी, सोनसाखळी चोरी, वाहन चोरी, लूटमार ते सशस्त्र दरोडे असे गंभीर गुन्हे करणाऱ्या संघटित टोळ्या महाराष्ट्र पोलिसांच्या हाताबाहेर गेल्या आहेत. बहुधा पोलिसांचा धाक नसल्याने या गंभीर गुन्ह्यांची महाराष्ट्रात सर्वाधिक नोंद झाली आहे. इतकेच नव्हे तर लोकसंख्येच्या मानाने ही गुन्हेगारी राज्यात झपाट्याने वाढते आहे. पर्यायाने चोरी झालेल्या मालमत्तेतही राज्य पहिल्या स्थानी येऊन पोहोचले आहे.
मुंबईसारख्या मेट्रो शहरांमध्ये सोनसाखळी चोरीचे सर्वात मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. मुंबईत तर दिवसाला तीन ते चार सोनसाखळी चोरीचे गुन्हे घडतात. प्रत्येक गुन्ह्यात सरासरी तीन तोळे वजनाचे सोन्याचे दागिने मारले जातात. विशेषत: या गुन्ह्यांमधले लक्ष्य हे रस्त्यांवरून पायी चालणाऱ्या स्त्रिया आहेत. आज एक तोळे सोन्याची किंमत २६ हजारांच्या आसपास आहे. तीन तोळ्याचा दागिना चोरी झाला तर तो फटका कोणत्याही स्तरातल्या कुटुंबाला सोसणारा नाही. नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या वर्षी महाराष्ट्रात सोनसाखळी चोरीसोबत अन्य जबरी चोरीचे ९४६६ गुन्हे घडले. दुसऱ्या क्रमांकावर दिल्ली असून तेथे ६४६४ तर तिसऱ्या स्थानी असलेल्या उत्तर प्रदेशात ३९२० गुन्हे घडले आहेत. विशेष म्हणजे एक लाख लोकसंख्येमागे ३ जबरी चोरीचे गुन्हे हा संपूर्ण देशभरातील सरासरी दर
आहे. हाच दर महाराष्ट्रात ८ इतका आहे.
त्याचप्रमाणे सशस्त्र दरोडेही महाराष्ट्रात सर्वाधिक पडले. गेल्या वर्षी दरोड्यांचे ८८५ गुन्हे घडले. त्यातल्या १३ गुन्ह्यांमध्ये दरोडेखोरांनी १५ जणांची हत्या केली. देशातला दर ०.४ इतका असून राज्यात तो दुप्पट म्हणजेच ०.८ इतका आहे. महाराष्ट्रानंतर ओडिशात ४८४, कर्नाटक-उत्तर प्रदेशात २९० दरोड्याचे गुन्हे नोंद झाले. महाराष्ट्रात घरफोड्यांचे प्रमाण अन्य राज्यांच्या तुलनेत मोठे आहे. गेल्या वर्षी राज्यात ३७२५ इतक्या घरफोड्या घडल्या. दिल्लीत ३४२६, गुजरातेत २८३९ घरफोडीच्या गुन्ह्यांची नोंद झाली.
चोरी या प्रकारात एनसीआरबीने मोबाइल चोरी, पाकीटमारीपासून वाहनचोरीपर्यंतचे गुन्हे एकत्रित केले आहेत. चोरीत दिल्ली देशात सर्वोच्च आहे, तर महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. गेल्या वर्षी दिल्लीत ७८७५३ तर महाराष्ट्रात ५६२८३ चोरीच्या गुन्ह्यांची नोंद झाली. या दोन्ही राज्यांमधील चोरीचा दर हा दरलाख लोकसंख्येमागे अनुक्रमे ३८८.३, ४७.८ इतका आहे. मात्र देशातील चोरीच्या गुन्ह्यांचा दर हा ३५.४ इतका आहे.
चोरीच्या उद्देशाने घरात घुसणे, चोरी करणे या गुन्ह्यातही महाराष्ट्रच एक नंबरवर आहे. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या दिल्लीत महाराष्ट्राच्या तुलनेत निम्म्याहून कमी गुन्हे घडले आहेत. या गुन्हेगारीचा दर पाहिल्यास दिल्ली महाराष्ट्रापेक्षा जास्त धोकादायक, असुरिक्षत आहे. मात्र देशातील सरासरी दरापेक्षा महाराष्ट्रातील गुन्हेगारीही वाढली
आहे. गुन्ह्यांची एकत्रित आकडेवारी ही त्या त्या राज्यांमधील पोलिसांना कोणती गुन्हेगारी वाढते आहे, ती मोडून काढण्यासाठी, आटोक्यात आणण्यासाठी काय उपाय योजायला हवेत, याचा विचार करायला भाग पाडते. त्यानुसार महाराष्ट्र पोलिसांना सर्वाधिक लक्ष स्ट्रीट क्राइमवर द्यायला हवा, असे ही आकडेवारी सुचवते.