चोरी करणाऱ्या दुकलीला अटक

By admin | Published: November 1, 2015 01:15 AM2015-11-01T01:15:17+5:302015-11-01T01:15:17+5:30

घरफोडीच्या आरोपाखाली अटकेत असणाऱ्या हॉटेल मालकाच्या पाठोपाठ त्या हॉटेलातील वेटरही चोरीच्या गुन्ह्यामध्ये सापडल्याची घटना घडली आहे. हा तरुण कधी ग्राहक बनून

Theft of a stolen shop | चोरी करणाऱ्या दुकलीला अटक

चोरी करणाऱ्या दुकलीला अटक

Next

मुंबई : घरफोडीच्या आरोपाखाली अटकेत असणाऱ्या हॉटेल मालकाच्या पाठोपाठ त्या हॉटेलातील वेटरही चोरीच्या गुन्ह्यामध्ये सापडल्याची घटना घडली आहे. हा तरुण कधी ग्राहक बनून, तर कधी वेटर म्हणून विविध हॉटेल्समध्ये चोरी करत असल्याचे तपासात उघड झाले आहे. जलमल सिंग मदनसिंग (३१), असे त्याचे नाव असून, त्याच्यासह साथीदार पी.पी सिंग भाटी (२९) यालाही पायधुनी पोलिसांनी अटक केली आहे.
पुणे येथील एका हॉटेलमध्ये जलमल वेटर म्हणून सात ते आठ महिने कामाला होता. त्यावेळी हॉटेल मालक एम. पाटीलला पायधुनी पोलिसांनी घरफोडीच्या एका गुन्ह्यात अटक केली. पुण्यातून विमानाने मुंबईत येऊन पाटील घरफोडी करत असल्याचे तपासात उघड झाले. मालक चोरी करू शकतो, तर आपण का नाही, असा विचार करून जलमलही असे कृत्य करु लागला. विविध हॉटेलमध्ये रूम बुक करून हा जलमल तेथे वास्तव्य करत होता. निघताना रूममधील फोन, दिव्यांसह एलईडी घेऊन तो पसार होत असे, तर रूमची बनावट चावी करून काही दिवसांनी त्याच खोलीशेजारी खोली घेऊन हा राहत होता.
जलमल हा शुक्रवारी रात्री मस्जिद बंदर येथील अ‍ॅपेक्स हॉटेलमधील एलईडी चोरून पसार होत असल्याची माहिती पायधुनी पोलिसांनी मिळाली. त्यानुसार सापळा रचून पोलिसांनी त्याला अटक केली. चौकशीतून त्याचा साथीदार भाटीचे नाव पुढे आले. त्याच्यामार्फत तो चोरलेला ऐवज मध्यप्रदेशातील आपल्या मूळ गावी पाठून विक्री करीत असे. दोघेजण मानखुर्द येथे भाड्याने खोली घेऊन राहत होते. जलमल सिंग हा श्रवण कुमार नावाने बनावट आधार कार्डाचा वापर करून रूम बुक करत होता. या प्रकरणी पायधुनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुनील कुवळेकर, सहायक निरीक्षक सुनील पवार, उपनिरीक्षक देशमुख आदी तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)

४० हॉटेलमध्ये गंडा
दोघा भामट्यांनी आतापर्यंत मुंबई ठाणे, नवी मुंबईसह तब्बल ४०हून अधिक हॉटेलमध्ये चोरी केल्याचे तपासातून उघडकीस आले आहे. पायधुनी पोलीस ठाण्यातच अशा प्रकारच्या चोरीबाबत तब्बल १० गुन्हे दाखल होते. साध्या हॉटेलपासून थ्री-स्टार हॉटेलमधील मालकांना जलमलने गंडा घातला आहे.

Web Title: Theft of a stolen shop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.