जांभूळविहीरमध्ये होते पाण्याचीही चोरी
By admin | Published: April 3, 2015 10:53 PM2015-04-03T22:53:11+5:302015-04-03T22:53:11+5:30
: उन्हाळ्यात आधीच पाणीटंचाईने त्रस्त झालेल्या नागरिकांना आता पाणीचोरांचा सामना करावा लागतो आहे. जव्हार शहरालगतच असलेल्या जांभूळ विहीर पूर्व,
जव्हार : उन्हाळ्यात आधीच पाणीटंचाईने त्रस्त झालेल्या नागरिकांना आता पाणीचोरांचा सामना करावा लागतो आहे. जव्हार शहरालगतच असलेल्या जांभूळ विहीर पूर्व, रायतळा ग्रामपंचायत हद्दीतील रहिवाशांनी पाईपलाईन फोडून पाणी चोरणाऱ्यांवर कारवाईची मागणी गटविकास अधिकाऱ्यांकडे केलेल्या अर्जात केली आहे.
जांभुळविहीर येथील वसाहत जव्हार शहरालगतच असून तेथे मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाले आहे. सहा-साडेसहा हजार लोकवस्ती असलेला हा परिसर रायतळा ग्रामपंचायत हद्दीत येतो. तेथे स्वतंत्र पाणीपुरवठा योजना असून ग्रामपंचायत त्यांच्याकडून पाणीपट्टी आकारत आहे. मात्र, दाट लोकवस्ती असलेल्या या वसाहतीतील अनेक रहिवाशांनी बेकायदेशीरपणे मुख्य पाइपलाइनलाच छिद्र पाडून त्याद्वारे कनेक्शन घेतले आहेत. विशेष बाब म्हणजे या पाणीचोरट्यांनी बेकायदेशीर पाइप लाइनला इलेक्ट्रीक मोटर बसवून पाणी खेचल्याने इतर रहिवाशांना पाणीपुरवठा होतच नाही. नियमीत कर भरूनही तेथील महिला, लहान मुले यांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. या गंभीर प्रश्नाबाबत रहिवाशांनी रायतळा ग्रामसेवकांकडे वारंवार तक्रारी केल्या. परंतु ग्रामसेवक त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप महिलांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे केला आहे.
या भागातील नव्वद टक्के रहिवासी हा नोकरवर्ग असल्यामुळे गृहीणींनाच पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. पाणी प्रश्नावरून पाणीचोर व पाणीपुरवठा न होणारे यामध्ये अनेकदा संघर्षदेखील झाला आहे. याचे पर्यावसन हाणामारीत होवू नये यासाठीच आम्ही गटविकास अधिकाऱ्यांकडे धाव घेतली. कारण हे पाणी चोरटे गुंड प्रवृत्तीचे असून त्याद्वारे ते या भाागात दहशत पसरवितात अशी तक्रार महिलांनी केली आहे.
गटविकास अधिकाऱ्यांना दिलेल्या तक्रार अर्जात परिसरातील संपूर्ण पाइप लाईनची तपासणी केल्यास पाणी गळती, चोरी कुठे होती याचा उलगडा होईल. संबंधीतांवर कडक कारवाई करून पाईप दुरूस्त करावे असे म्हटले आहे.
(वार्ताहर)