Join us

‘त्यां’ची दर आठवड्याची कमाई साडेतीन लाखांची; टाटा रुग्णालयातील गैरप्रकार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2023 12:05 PM

टाटा रुग्णालयातील गैरप्रकार

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : परेल येथील टाटा रुग्णालयातील सहायक प्रशासकीय अधिकाऱ्यासह कर्मचारीच कमिशनसाठी रॅकेट चालवत असल्याचा धक्कादायक प्रकार भोईवाडा पोलिसांच्या कारवाईतून समोर आला आहे. या कर्मचाऱ्यांची आठवड्याची कमाई साडेतीन लाखांहून अधिक असल्याची माहिती समोर येत आहे. रुग्णालयात सुविधा उपलब्ध असतानाही रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना विविध चाचण्यांसाठी खासगी प्रयोगशाळेत पाठविण्यात येत होते. ही टोळी कमिशनसाठी रुग्णांची पिळवणूक करत होती. याप्रकरणी अन्य आरोपींचा शोध सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १० जुलै ते आतापर्यंत रुग्णालयाचे सहायक प्रशासकीय अधिकारी, हवालदार, वॉर्ड बॉय, शिपाई, आया व सफाई कर्मचारी या पदावर काम करणारे कर्मचारी यांनी कोणताही कायदेशीर अधिकार नसताना स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता इन्फिनिटी सेस व्यवस्थापक संजय सोनावणे व मालक तसेच व इतर डायग्नोसिस सेंटर चालविणाऱ्या चालकांशी  संगनमत करून हे रॅकेट चालवत होते. सोनावणे याला काही दिवसांपूर्वी टाटा रुग्णालयातील सुरक्षारक्षकांनी पकडले होते. त्यावेळी त्याच्याकडे विविध पाकिटे सापडली. त्यात रोख रक्कम होती. या पाकिटांवर रुग्णालयातील काही कर्मचाऱ्यांची नावे लिहिलेली असल्याचे दिसून येताच हा धक्कादायक प्रकार समोर आला. जवळपास साडेतीन लाखांहून अधिकची रक्कम पाकिटात होती. ती आठवड्याभराची कमाई असल्याची माहिती समोर येत आहे. टाटा रुग्णालयाचे सुरक्षा अधिकारी अनिल शिवाजी भोसले (५६) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला. गेल्या अनेक दिवसांपासून या टोळीकडून लूट सुरू होती. याबाबत अधिक तपास सुरू आहे.

असे चालायचे रॅकेटरुग्णालयात उपचारांसाठी आलेल्या गरीब रुग्णांना विविध वैद्यकीय चाचण्या या रुग्णालयात तत्काळ उपलब्ध असतानाही, केवळ स्वतःच्या कमिशनसाठी त्यांना खासगी डायग्नोस्टिक सेंटरमध्ये चाचणी करण्यास लावून गरीब कॅन्सरग्रस्त लोकांची तसेच शासनाची देखील लाखो रुपयांची आर्थिक फसवणूक करत होते. एक्स रे, सिटी स्कॅनसह विविध चाचण्यांसाठीही लूट सुरू होती. अटक आरोपी...विकास गमरे (२१), नारायण चौधरी (४७), संजय सोनावणे (४२), राकेश परदेशी (४९), राजेश वारीया (४०), संदीप गावकर (३५), रवी परदेशी (५४), राहुल मायावंशी (३६), जितेंद्र भरणवाल (५४), सकीर सय्यद ( ४०), दिनेश कलवार (४२) यांना अटक केली आहे. ११ आरोपींना २१ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

टॅग्स :मुंबईगुन्हेगारीटाटा