यांचं असं आणि त्यांचं तसं..
By admin | Published: September 22, 2014 11:16 PM2014-09-22T23:16:04+5:302014-09-23T00:10:50+5:30
. सरकारनामा
मदन पाटील यांच्याविरोधात उमेदवार उभा करणार असल्याची आरोळी राष्ट्रवादीनं रविवारच्या मेळाव्यात ठोकली. (या आरोळीला गर्जना, वल्गना, फुकाची बडबड यापैकी काय म्हणायचं?) भाजपमधून डाळ शिजणार नसल्याचं दिसल्यानं बहुदा ही मंडळी या निर्धारापर्यंत आली असावीत. (या मंडळींत दिनकरतात्यांसोबत ती ख्यातनाम ‘चांडाळ चौकडी’ही सामील आहे. संजय बजाजना विचारा हवं तर! त्यांनीच तर ‘चौकडी’ची जाहीर कबुली दिलीय.) खरं तर, राष्ट्रवादीची झालीय गोची! त्यांना स्वतंत्र उमेदवार उभा करण्याशिवाय पर्यायच नसावा. कारण मदन पाटील आणि संभाजी पवार हे दोघंही त्यांना नकोत. मागच्या वेळी याच मंडळींची रसद मिळाल्यानं संभाजीआप्पांनी बाजी मारली होती. (पण आता ते जाहीरपणे सांगायचं कसं?) यंदा मात्र आप्पांचं ‘साहेबां’शी फाटल्यानं आणि भाजपचा उमेदवार ऐकेलच (जो असंल तो) याची खात्री नसल्यानं भाजपला देण्यात येणारी आयती मदत थांबवण्यात येणार असल्याचं दिसतंय. (भाजपमधल्या ‘रेस’मधून श्रीनिवास पाटलांचं नाव मागं पडलंय की काय? त्यांच्या घरी बैठकांना गेलेल्या भाजपेयींना विचारायला पाहिजे.) राष्ट्रवादीनं भाजपला हात देणं काय आणि स्वतंत्र उमेदवार देणं काय, एकूण एकच! जणू यांच्या मदतीवरच काँग्रेसवाल्यांनी निवडून येण्याचे इमले बांधलेत!!
पहिल्यांदा दिनकरतात्या, सुरेशअण्णा यांनी ठरवावं की, आपल्यापैकी कोण? श्रीनिवास पाटलांचं नाव इथंही मागं पडलंय वाटतं. (त्यांनी पक्षाच्या बैठकीला दांडी मारल्यामुळंच अशी कुजबूज ऐकू येतेय हं!) तात्या की अण्णा, हे ठरवणार कोण? ‘साहेब’ कोणाच्या बाजूनं? मग आबा काय करणार? आघाडी झाली तर आबा ‘आघाडी धर्म’ पाळणार की, ‘साहेबां’च्या खेळीला संमती देणार? चौकडीत तरी एकमत आहे का? कुणा एकाच्या नावावर एकमत झाल्यावर इतर मंडळी काय करणार? भाऊंनी डोळा मारल्यावर तिकडं जाणार नाहीत कशावरून? अशा सवालांची सरबत्ती बैठकीनंतर घड्याळवाल्यांकडूनच एकमेकांच्या कानात सुरू होती.
राष्ट्रवादीचं असं, तर तिकडं काँग्रेसवालेही भारीच बुवा. जिल्हा परिषदेत एकमेकांविरुद्ध लढून, हाणामाऱ्या करून झाल्यावर आता राष्ट्रवादीकडं सत्तेत वाटा मागताहेत. हात दाखवून अवलक्षण! बहुमत हातात असल्यावर घड्याळाला हाताची गरज तरी पडंल का? त्यातच काँग्रेसचे माजी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र पाटील यांनी लगेच सोमवारी पत्रकार परिषद घेऊन इस्लामपुरातून जयंतरावांना विरोध करणार असल्याचं जाहीर केलं. (सगळे विरोधक कधी एकत्र येणार आणि जयंतरावांना घामाघूम करून सोडणार, कुणास ठाऊक! जयंतरावांचं हेच तर प्रमुख बलस्थान!) हे पाडापाडीचं राजकारण सांगलीला नवं नाही. ‘हातात हात आणि पायात पाय’ या नीतीचा प्रत्येक निवडणुकीत अनुभव येतोय. राष्ट्रवादीच्या निर्मितीनंतर ‘काँग्रेसच काँग्रेसचा पराभव करू शकते’ हे समीकरण बदलून ‘काँग्रेसच्या मदतीनं राष्ट्रवादीही काँग्रेसचा पराभव करू शकते’ आणि ‘भाजपला हात देऊन काँग्रेसही राष्ट्रवादीला उलटं करू शकते’ हे गणित जिल्ह्यात नव्यानं जन्माला आलंय. आता विधानसभेच्या रिंगणात तरी वेगळं काय दिसणारेय?
- श्रीनिवास नागे