त्यांच्यासाठी ‘तो’ देवदूत ठरला!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2019 05:21 AM2019-07-18T05:21:38+5:302019-07-18T05:21:56+5:30
आक्रोश... चिंता... धाकधूक आणि आपला जीव वाचविण्याची धडपड सुरू असताना एका तरुणाने स्वत:च्या जीवाची पर्वा न करता दोघांचा जीव वाचविला.
मुंबई- आक्रोश... चिंता... धाकधूक आणि आपला जीव वाचविण्याची धडपड सुरू असताना एका तरुणाने स्वत:च्या जीवाची पर्वा न करता दोघांचा जीव वाचविला. डोंगरी दुर्घटनेत इम्रान हुसेन कलवानिया (३०) या तरुणाने एका लहानग्याचे व पुरुषाचे प्राण वाचविले. यात तो जखमी झाला आहे. बुधवारी सायंकाळी उशिरा इम्रानला उपचारानंतर जे.जे. रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. डोंगरी दुर्घटनेच्या शेजारील इमारतीत राहणारा इम्रानने घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली. क्षणाचाही विचार न करता जीव धोक्यात घालून त्याने घटनास्थळावरील ढिगारा उपसण्यास सुरुवात केली. ‘या मदतकार्यात आपलाही जीव जाऊ शकतो असा क्षणभरही विचार मनात आला नाही’, असे इम्रान धाडसाने सांगतो. ‘मदत करताना माझ्या गुडघ्याला थोडी जखम झाली आहे, मात्र दोघांना जीवनदान मिळाले याचा जास्त आनंद आहे.’ असे तो म्हणाला. ‘इमारत कोसळल्याचा आवाज येताच मी धावत आलो. पण खूप धूळ झाली होती, फक्त मदतीसाठीचे आवाज ऐकू येत होते, तेही अस्पष्ट..
खूप गर्दी झाली होती. बचावासाठी यंत्रणा दाखल झाली होती, मात्र आपणही त्यात खारीचा वाटा उचलावा म्हणून कसलाही विचार न करता माझ्या परीने ढिगारा उपसण्यास मी सुरुवात केली अन् एका पुरुषला वाचविले. त्यानंतर एका लहानग्यालाही वाचविले, परंतू त्याच वेळी भिंतीचा काही भाग माझ्या अंगावर कोसळला आणि मीही जखमी झालो,’ असे सांगताना इम्रानच्या डोळ्यात दोघांना वाचवल्याचे समाधान होते. इम्रानने दाखविलेल्या हिंमतीचे कौतुक जे.जे. रुग्णालयातील डॉक्टरांनीही केले.