...तर ३६ हजार कोरोना रुग्णांची सोय एका ठिकाणीच होईल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:05 AM2021-06-04T04:05:54+5:302021-06-04T04:05:54+5:30
मुंबई : कोरोना रुग्णांची वाढणारी संख्या आणि तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन एमएमआरडीए, मुंबई महापालिका प्रशासन, म्हाडाच्या माध्यमातून मुंबईत ...
मुंबई : कोरोना रुग्णांची वाढणारी संख्या आणि तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन एमएमआरडीए, मुंबई महापालिका प्रशासन, म्हाडाच्या माध्यमातून मुंबईत नवीन जम्बो कोविड सेंटर उभे करण्याचे प्रयास सुरू आहेत; मात्र आता जम्बो कोविड सेंटर उभारताना कायमस्वरूपी व्यवस्था निर्माण करण्याच्या दृष्टीने प्रकल्पग्रस्तांसाठी बांधलेली बंद घरे, अन्न महामंडळाची गोदामे यांचा वापर करण्याची विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांच्याकडे करण्यात आली आहे.
विमानतळाच्या परिसरातील झोपडीवासियांचे पुनर्वसन करण्यासाठी विद्याविहार पश्चिमेला वन रूम किचनची १८ हजार घरे गेली दहा वर्षे बांधून तयार आहेत. सध्या ही घरे वापरात नसल्यामुळे घरांची दुरुस्ती रंगरंगोटी करून त्याचा रुग्णांच्या विलगीकरण, तसेच उपचारांसाठी वापर करता येईल. एका सदनिकेत (दोन खोल्या) अगदी दोन रुग्णांची व्यवस्था केली, तरी तब्बल ३६ हजार रुग्णांची एका ठिकाणी सोय होऊ शकेल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. रे रोड-मस्जिद बंदर तसेच बोरीवली येथे अन्न महामंडळाची प्रचंड मोठी गोदामे वापराअभावी पडून आहेत. त्याचाही कोविड सेंटर उभी करताना विचार व्हायला हवा, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
गतवर्षी काही कंपन्यांच्या सीएसआर फंडातून सव्वाशे ते दीडशे कोटी रुपये खर्चून महालक्ष्मी रेसकोर्सवर एक जम्बो कोविड सेंटर उभे करण्यात आले. कोरोना रुग्णांची संख्या कमी होऊ लागली म्हणून ते मोडूनही टाकण्यात आले. आता पुन्हा त्याच ठिकाणी पन्नास-शंभर कोटी रुपये खर्च करून जम्बो सेंटर उभे करण्यात येत आहे. याच पद्धतीने म्हाडातर्फे चुनाभट्टी येथील सोमय्या ग्राउंडवर तसेच एमएम आरडीएच्या माध्यमातूनही एक कोविड सेंटर उभे केले जात आहे. वास्तवात असे तात्पुरते काही करण्यापेक्षा स्थायी काही निर्माण करता येईल का, वा उपलब्ध सुविधांचा वापर करता येईल का, याचा विचार व्हावा, असे मुंबईचे अभ्यासक प्रभाकर नारकर यांनी सांगितले.
------------------
बाहेरील रुग्णांनाही फायदा
मुंबईत रुग्णसंख्या कमी होऊ लागल्याने बेडची उणीव जाणवत नसली तरी ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणावर बेडची कमतरता आहे. त्यामुळे बाहेरील रुग्णांनाही मुंबईत आणून त्यांच्यावर उपचार करता येतील.
------------------
सदनिकांची दुरुस्ती होईल
विद्याविहार येथील घरे वापरली तर यातून आपोआपच गेली दहा वर्षे पडून असलेल्या सदनिकांची दुरुस्ती व रंगरंगोटी होऊन भविष्यात ही घरे संबंधित रहिवाशांना देण्यासाठी उपलब्ध होतील.
------------------
सदनिका अशाच पडून आहेत
मुंबई आणखीही काही ठिकाणी प्रकल्पग्रस्तांसाठी बांधलेल्या सदनिका अशाच पडून आहेत. त्याचाही असाच वापर करता येईल. रे रोड - मस्जिद बंदर तसेच बोरीवली येथे अन्न महामंडळाची प्रचंड मोठी गोदामे वापराअभावी पडून आहेत. त्याचाही कोविड सेंटर उभी करताना विचार व्हायला हवा.
------------------
धोका आणखी काही काळ
वास्तवात गेल्या वर्षभरात विद्यमान रुग्णालय सक्षम करण्याबरोबरच उपनगरासाठी आणखी एक सेंटर उभे राहू शकले असते. कोविडचा धोका आणखी काही काळ राहणार असल्यामुळे सूचनांचा गांभीर्याने विचार व्हावा. त्याची अंमलबजावणी करण्यात यावी. त्यामुळे खर्चात मोठ्या प्रमाणावर बचत होईल, असेही म्हणणे मांडले जात आहे.
------------------
महापालिका कार्यवाही कधी करणार
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांच्याकडे याबाबत जी विनंती करण्यात आली त्यास आता एक महिन्याहून अधिक काळ लोटला आहे; मात्र अद्याप महापालिकेने काही कार्यवाही केली नाही.
------------------
प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी...
मुंबईकर नागरिकांनी महानगरपालिकेद्वारे वेळोवेळी करण्यात आलेल्या आवाहनांना उत्तम प्रतिसाद दिल्यामुळे कोविडच्या दुसऱ्या लाटे दरम्यान उत्तम व्यवस्थापन करणे महानगरपालिका प्रशासनाला शक्य झाले आहे; मात्र प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी वरील घटकांचा विचार करण्यात यावा, यावर भर दिला जात आहे.
------------------
तिसरी लाट आणि...
तिसऱ्या लाटे दरम्यान लहान मुलांना व झोपडपट्टी परिसरांमधील रहिवाश्यांना संसर्गाची अधिक शक्यता असल्याचे तज्ज्ञांद्वारे सांगितले जात आहे. त्यादृष्टीने सुसज्ज व सतर्क राहण्यासाठी याकडे लक्ष वेधले गेले आहे.
------------------