लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : काेराेनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता खबरदारी बाळगणे गरजेचे आहे. विमानतळाच्या परिसरातील झोपडपट्टीवासीयांचे पुनर्वसन करण्यासाठी विद्याविहार पश्चिमेला वन रूम किचनची १८ हजार घरे गेली. दहा वर्षे बांधून तयार आहेत. सध्या ही घरे वापरात नसल्यामुळे त्याचा काेराेना रुग्णांचे विलगीकरण, उपचारांसाठी वापर करता येईल. एका सदनिकेत (दोन खोल्या) अगदी दोन रुग्णांची व्यवस्था केली, तरी तब्बल ३६ हजार रुग्णांची एका ठिकाणी सोय होऊ शकेल. रे रोड - मस्जिद बंदर तसेच बोरीवली येथे अन्न महामंडळाची प्रचंड मोठी गोदामे वापराअभावी पडून आहेत, त्याचाही कोविड सेंटर उभी करताना विचार व्हायला हवा, असे मत तज्ज्ञांनी मांडले.
कोरोना रुग्णांची वाढणारी संख्या आणि तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन एमएमआरडीए, मुंबई महापालिका प्रशासन, म्हाडाच्या माध्यमातून मुंबईत नवीन जम्बो कोविड सेंटर उभे करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आता जम्बो कोविड सेंटर उभारताना कायमस्वरूपी व्यवस्था निर्माण करण्याच्या दृष्टीने प्रकल्पग्रस्तांसाठी बांधलेली बंद घरे, अन्न महामंडळाची गोदामे यांचा वापर करण्याची विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांच्याकडे करण्यात आली आहे.
.................................................