...तर दुर्घटना टळली असती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:05 AM2021-06-11T04:05:58+5:302021-06-11T04:05:58+5:30
शेजारच्यांनी अनेकदा वर्तवली होती भीती; क्षणार्धात उद्ध्वस्त झालेे हसतेखेळते कुटुंब लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मालाड मालवणीतील चार मजली ...
शेजारच्यांनी अनेकदा वर्तवली होती भीती; क्षणार्धात उद्ध्वस्त झालेे हसतेखेळते कुटुंब
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मालाड मालवणीतील चार मजली रहिवासी बांधकाम पाच ते सहा वर्षांपूर्वीच बांधले होते. त्याला तडे गेल्यानंतर बांधकामाचा काही भाग वाकत चालला होता. अशावेळी वेळीच रहिवाशांना घर खाली करायला हाेऊन दुरुस्तीचे काम करून घेणे गरजेचे असताना घरमालकाने त्यातील भेगांमध्ये सिमेंट भरून वरवरची डागडुजी केली. वेळीच लक्ष दिले असते, तर दुर्घटना टळली असती, हसतेखेळते कुटुंब उद्ध्वस्त झालेे नसते, असे शेजाऱ्यांचे म्हणणे आहे.
मालाड मालवणी येथील न्यू कलेक्टर कंपाउंडमध्ये अनेक घरे दाटीवाटीने उभी आहेत. हातावर पोट असलेली मंडळी जीव मुठीत धरून अशा घरात राहत आहेत. दुर्घटनाग्रस्त झालेले बांधकाम ५ ते ६ वर्षांपूर्वीच बांधल्याचे समजते. त्यात तौक्ते चक्रीवादळादरम्यान या बांधकामाला तडे गेले होते. त्यात सिमेंट भरून मालकाने दुर्लक्ष केले. बांधकाम एका बाजूला झुकल्याबाबत रहिवाशांनी घरमालकाला सांगितले होते. घराचे काम लवकर करून द्या; अन्यथा ते कधीही कोसळू शकते, अशी भीतीही घरमालकाकडे वर्तवली होती, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.
याच परिसरात राहणाऱ्या आसीफ उस्मान खानने दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या काही मिनिटांपूर्वी काही तरी तुटण्याचा आवाज येत असल्यामुळे येथे राहणाऱ्यांनी स्थानिक तरुणाला घरमालकाला लवकर बोलावून आणण्यास सांगितले होते. संबंधित तरुण मालकाला बोलावण्यासाठी गेला. मात्र, त्यादरम्यान काही मिनिटांतच बांधकाम कोसळले. या दुर्घटनेत एकाच कुटुंंबातील ९ जणांचा मृत्यू झाला. काही क्षणांतच हसतेखेळते कुटुंब उद्ध्वस्त झाले. मालकाने वेळीच खबरदारी घेतली असती, तर दुर्घटना घडली नसती, असे त्याने सांगितले.
* घर काेसळण्याची लागली हाेती चाहूल
बांधकाम कोसळण्याच्या काही मिनिटे आधी काहीतरी काेसळत असल्याची चाहूल येथील एकाला झाली. कसला तरी आवाज येत असल्याचे म्हणत तेथील एका रहिवाशाने स्थानिक तरुणाला घरमालकाला बोलावून आणण्यास सांगितले. पुढे, काही हालचाल करण्यापूर्वी काही मिनिटांतच बांधकामाचा भाग कोसळून दुर्घटना घडली.
* थोडक्यात वाचलो
दुर्घटनाग्रस्त बांधकामाशेजारील इमारतीत राहणाऱ्या आसीफ खान या तरुणाने दिलेल्या माहितीनुसार, रात्री जेवण उरकून याच घराखाली मित्रासोबत गप्पा मारत बसलाे हाेताे. त्यानंतर घरी येऊन काही मिनिटे होत नाहीत, तोच हे बांधकाम कोसळल्याचे समजले. अवघ्या काही मिनिटांच्या फरकामुळे मी आणि माझा मित्र सुखरूप वाचलाे.
..................................................