Join us

...तर दुर्घटना टळली असती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 4:05 AM

कॅप्टनच्या निष्काळजीपणामुळे कर्मचाऱ्यांचा बळी, अभियंत्याचा पाेलिसांना जबाबलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : हवामान विभागाकडून धोक्याची सूचना मिळाल्यानंतरही तौक्ते चक्रीवादळ ...

कॅप्टनच्या निष्काळजीपणामुळे कर्मचाऱ्यांचा बळी, अभियंत्याचा पाेलिसांना जबाब

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : हवामान विभागाकडून धोक्याची सूचना मिळाल्यानंतरही तौक्ते चक्रीवादळ जास्त वेळ राहणार नाही, ते आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही, या भ्रमात, कॅप्टन राकेश बल्लवने बार्ज पी-३०५ ला सुरक्षितस्थळी हलविले नाही. शिवाय आपत्कालीन परिस्थितीत डिस्ट्रेस सिग्नल देणे आवश्यक होते. परंतु त्यावेळी त्यांनी डिस्ट्रेस सिग्नल दिला नाही, त्यामुळे मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांचा बळी गेला. अन्यथा दुर्घटना टळली असती, असे अभियंता रेहमान शेख यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात नमूद केले आहे.

यलोगेट पोलिसांनी शेख यांच्या तक्रारीवरून कॅप्टनविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. शेख यांच्या तक्रारीनुसार, बार्ज एकूण ८ अँकर खोल समुद्रात टाकून ओएनजीसी प्लॅटफॉर्म शेजारी उभे केले होते. वादळास बाजपर्यंत पोहोचण्यास वेळ लागणार होता. तसेच हे वादळ जास्तकाळ थांबणार नसल्याने कॅप्टन राकेश बल्लव यांनी त्यांच्या वरिष्ठांशी संपर्क साधला. जहाज सुरक्षितस्थळी न हलविता त्याच ठिकाणी थांबविण्याच्या सूचना आम्हाला कॅप्टनकडून मिळाल्या हाेत्या. तसेच धोक्याची परिस्थिती आल्यास नोवे नावाची टग बोट सुरक्षितस्थळी हलविण्याकरिता ५ नाँटीकल मैलाच्या दरम्यान होती, असेही सांगण्यात आले.

त्या दरम्यान साेमवारी पहाटे २ च्या सुमारास एकूण ८ अँकर्सपैकी वेगवान वाऱ्याचा ताण सहन न झाल्याने एस ३, एस ४ या अशा दोन अँकरच्या केबल तुटल्याने अँकर बार्जपासून वेगळे झाले. धोक्याची परिस्थिती निर्माण झाली. बार्ज ६ अँकरवर होते. त्यावेळी कॅप्टन राकेश बल्लव यांनी नोवे टग बोटीला मदतीसाठी येण्याचा संदेश दिला. परंतु त्यावेळी ते १६ नाँटीकल मैलावर असल्याचे समजले. त्या दरम्यान कॅप्टनने आपत्कालीन परिस्थितीत डिस्ट्रेस सिग्नल देणे आवश्यक होते. परंतु त्यांनी ताे दिला नाही. पुढे सगळे अँकर तुटले आणि कॅप्टनच्या निष्काळजीपणामुळे कर्मचाऱ्यांचा बळी गेल्याचा आरोप शेख यांनी केला. याप्रकरणी यलोगेट पोलीस स्टेशन अधिक तपास करत आहे.

* बार्ज सुरक्षितस्थळी हलविला नाही

संकट समाेर आवासून उभे असताना आणि त्याबाबत पूर्वसूचना मिळाली असतानाही कॅप्टन राकेश बल्लव यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. बार्ज सुरक्षितस्थळी हलवला नाही. शिवाय, आपत्कालीन परिस्थितीत डिस्ट्रेस सिग्नल देणे आवश्यक असतानाही परंतु त्यावेळी त्यांनी डिस्ट्रेस सिग्नल दिला नाही. त्यांनी प्रसंगावधान राखले असते तर अनेकांचे जीव वाचले असते, अशी खंत अभियंता शेख यांनी व्यक्त केली.

............................................