...तर १३ जूनपासून पुन्हा डॉक्टर संपावर, वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांना पत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2018 01:16 AM2018-06-07T01:16:31+5:302018-06-07T01:16:31+5:30
पावसाळ्याच्या दिवसांत साथीचे रोग वाढतात, त्यामुळे आरोग्य यंत्रणेवरील भारही वाढतो. मात्र, आता अशाच परिस्थितीत पुन्हा १३ जूनपासून असोसिएशन आॅफ स्टेट मेडिकल इंटर्न्सने बेमुदत संपावर जाण्याचा इशारा दिला आहे.
मुंबई : पावसाळ्याच्या दिवसांत साथीचे रोग वाढतात, त्यामुळे आरोग्य यंत्रणेवरील भारही वाढतो. मात्र, आता अशाच परिस्थितीत पुन्हा १३ जूनपासून असोसिएशन आॅफ स्टेट मेडिकल इंटर्न्सने बेमुदत संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. राज्यातील शासकीय वैद्यकीय आणि दंत महाविद्यालयातील इंटर्न्स डॉक्टरांना काही दिवसांपूर्वी वेतनवाढीसंदर्भात वैद्यकीय शिक्षण संचालनालयाने आश्वासन दिले होते, परंतु त्याची पूर्तता होत नसल्याने बुधवारी वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांना असोसिएशनच्या वतीने लेखी पत्राद्वारे संपाचा इशारा देण्यात आला आहे.
जुलै २०१५ साली इंटर्न्स डॉक्टरांना ११ हजार वेतनमान मिळावे हा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर, दरवर्षी पाठपुरावा करूनही यात वाढ करण्यात आली नाही. या पार्श्वभूमीवर, २६ एप्रिल २०१८ रोजी राज्यभरातील शासकीय वैद्यकीय व दंत महाविद्यालयातील इंटर्न्स डॉक्टरांनी मूकमोर्चा आणि निषेध प्रदर्शने केली. त्यानंतर, २ मे रोजी वैद्यकीय शिक्षण संचालनालय आणि अर्थ विभागाच्या पदाधिकाऱ्यांच्या सोबत झालेल्या बैठकीत तातडीने इंटर्न्सना वेतनवाढ करण्याचे आश्वासन देण्यात आले, पण अद्यापही त्यावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही झालेली नाही. सध्या राज्यभरात २ हजार ३०० इंटर्न्स डॉक्टर्स आहेत. त्यामुळे ऐन पावसाळ्यात हे डॉक्टर्स संपावर गेल्यास त्याचा रुग्णसेवेवर गंभीर परिणाम होईल. याचा फटका सामान्यांना बसण्याची शक्यता आहे.
याविषयी, असोसिएशन आॅफ स्टेट मेडिकल इंटर्न्सचे सचिव गोकुळ राख यांनी सांगितले की, सरकारी दिरंगाईमुळे हा विषय चार वर्षांपासून रखडला आहे. त्यामुळे आता सरकारने तातडीने शासन निर्णय जारी न केल्यास, राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय रुग्णातलयातील इंटर्न्स डॉक्टर १३ जूनपासून बेमुदत संपावर जाणार आहेत, तरी तातडीने प्रशासनाने याविषयी निर्णय घ्यावा.
पर्यायच नाही
जुलै २०१५ साली इंटर्न्स डॉक्टरांना ११ हजार वेतनमान मिळावे हा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर, दरवर्षी पाठपुरावा करूनही यात वाढ करण्यात आली नाही. त्यामुळे इतर कुठलाच पर्याय शिल्लक राहिला नसल्याने संपावर जाण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती असोसिएशन आॅफ स्टेट मेडिकल इंटर्न्सने दिली.
महत्त्वाच्या मागण्या : तातडीने सर्व इंटर्न्स डॉक्टरांचे वेतनवाढ करणे, वाढीव वेतनमान फेब्रुवारी २०१८ पासून लागू करणे