मुंबई : आवडीच्या वाहिन्यांची यादी देण्यामध्ये देशातील कोट्यवधी ग्राहक अपयशी ठरल्याने भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाला (ट्राय) यासाठीची मुदत ३१ मार्चपर्यंत वाढवावी लागली आहे. मात्र ३१ मार्चपर्यंत जे ग्राहक त्यांच्या आवडीच्या वाहिन्यांची यादी सादर करणार नाहीत व नवीन नियमावलीप्रमाणे नवीन प्लॅन निश्चित करणार नाहीत त्यांना ‘बेस्ट फिट प्लॅन’द्वारे केबल व डीटीएच सेवा पुरवली जाईल.
ग्राहकांकडून सर्वसाधारणपणे पाहिल्या जाणाऱ्या वाहिन्यांच्या अभ्यासावर व त्यांच्या भाषेवर आधारित बेस्ट फिट प्लॅन केबल आॅपरेटर व डीटीएच सेवा पुरवठादार ठरवतील व त्याद्वारे ग्राहकांना केबल व डीटीएच सेवा पुरविण्यात येईल.
बेसिक पॅकेजसाठीचे १०० वाहिन्यांसाठीचे १३० रुपये व त्यावरील १८ टक्के जीएसटी अशा प्रकारे एकूण १५४ रुपये व उर्वरित वाहिन्यांची किंमत जोडून विद्यमान पॅकेजच्या किमतीपर्यंत दर होईल याची काळजी या बेस्ट फिट प्लॅनमध्ये घेण्यात येईल.
देशात सध्या १० कोटी केबल टीव्ही ग्राहक व ६.७ कोटी डीटीएच सेवेचे ग्राहक आहेत. यापैकी केबल टीव्हीच्या ६५ टक्के व डीटीएच सेवेच्या ३५ टक्के ग्राहकांनी आपल्या आवडीच्या वाहिन्यांची निवड केली आहे. मात्र उर्वरित ग्राहकांनी याकडे अद्याप लक्ष दिलेले नाही.बेस्ट फिट प्लॅनमध्ये सध्याच्या दरापेक्षा जास्त किंमत आकारल्याची तक्रार आल्यास संबंधितांविरोधात कडक कारवाई करण्याचा इशारा ट्रायने दिला आहे.बेस्ट फिट प्लॅन म्हणजे काय?
- ज्या ग्राहकांनी आवडीच्या वाहिन्या निवडल्या नाहीत त्यांच्यासाठी बेस्ट फिट प्लॅन योजना आहे.- ग्राहकाकडून सातत्याने पाहिल्या जाणाºया वाहिन्यांचाच यामध्ये समावेश असेल. या प्लॅनची किंमत सध्याच्या केबल, डीटीएच दरापेक्षा जास्त होणार नाही याची काळजी घेतली जाईल.- ग्राहक कधीही आपल्या आवडीच्या वाहिन्यांची यादी करून कळवू शकेल.- आवडीच्या वाहिन्या निवडल्यावर विद्यमान पॅकेजच्या दरापेक्षा कमी अथवा जास्त दर होईल त्याप्रमाणे किंमत आकारली जाईल.- ग्राहकांनी ३१ मार्च २०१९ पर्यंत आवडीच्या वाहिन्या निवडल्या नाहीत तर बेस्ट फिट प्लॅनप्रमाणे वाहिन्या दिसतील व किंमत आकारली जाईल.७२ तासांत प्लॅन मिळणार बदलून
- ज्या ग्राहकांना बेस्ट फिट प्लॅनऐवजी आवडीच्या वाहिन्यांची निवड करायची असेल त्या वेळी ग्राहक निवड करून केबल आॅपरेटरला कळवू शकतील.- ग्राहकांनी आवडीच्या वाहिन्यांची निवड केल्यावर ७२ तासांमध्ये बेस्ट फिट प्लॅनमधून ग्राहकांनी निवडलेल्या वाहिन्यांचे प्रक्षेपण सुरू करण्याचे निर्देश ट्रायने दिले आहेत.