...तर बनावट लसीकरणातील लाभार्थ्यांचे अँटिबॉडीज तपासणार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2021 06:50 AM2021-06-27T06:50:07+5:302021-06-27T06:50:37+5:30
पालिका प्रशासन; नेमके कसले इंजेक्शन दिले याचा शाेध सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : बाेगस लसीकरणाचे अनेक प्रकार मुंबईत समोर येऊ लागले आहेत. याप्रकरणाची पोलिसांमार्फत चौकशी सुरू असून अशा लस देण्यात आलेल्या नागरिकांच्या प्रकृतीवर मुंबई महापालिका प्रशासन लक्ष ठेवून आहे. आवश्यकतेनुसार बनावट लस घेलतेल्या संबंधित लाभार्थ्यांमधील अँटिबॉडीज तपासले जाणार आहेत. पोलिसांच्या अहवालातून ती लस बनावट असल्याचे निष्पन्न झाल्यास संबंधितांना पुन्हा लस देण्याबाबत नियोजन केले जाईल, असे पालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
कांदिवली येथील हिरानंदानी सोसायटीत ३९० लाभार्थ्यांना ३० मे रोजी खाजगी केंद्रामार्फत कोविड प्रतिबंधक लस देण्यात आली होती. मात्र काही दिवसांनी नागरिकांच्या तक्रारीनंतर ही लसीकरण मोहीम बनावट असल्याचे समोर आले. या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला असून काहींना अटकही करण्यात आली आहे. मात्र या नागरिकांना नेमके कसले इंजेक्शन देण्यात आले होते, याचा शोध सुरू आहे.
प्रकृतीवर बारकाईने लक्ष
कांदिवलीतील लाभार्थ्यांना देण्यात आलेली लस म्हणजे सलाईन किंवा ग्लुकोजचे पाणी असण्याची शक्यता आहे. तरीही याबाबत खात्री करून घेण्यासाठी महापालिकेमार्फत लाभार्थ्यांची संपर्क साधून त्यांच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येणार आहे. मात्र लस देऊन २८ दिवसांचा कालावधी उलटला असून अद्याप कोणामध्येही दुष्परिणाम झाल्याचे दिसून आले नाही, असे पालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
...त्यानंतरच देणार पुन्हा लस
कोरोना बाधित किंवा लस घेतलेल्या लोकांमध्ये काही दिवसांतच अँटिबॉडीज तयार होतात. ही रोगप्रतिकारशक्ती कोरोनाला आळा घालू शकते. मात्र लस बोगस असल्यास अँटिबॉडीज तयार होणार नाहीत. बोगस लसीकरणातील लाभार्थ्यांपैकी निम्म्यापेक्षा कमी किंवा कोणामध्येही अँटिबॉडीज आढळून न आल्यास त्यांना देण्यात आलेली लस बनावट असल्याचे स्पष्ट होईल. संबंधितांना पुन्हा लस देण्याबाबत नियोजन केले जाईल.
पाेलिसांच्या तपासानुसार पुढील निर्णय
कांदिवलीतील लाभार्थ्यांना दिलेली लस बनावट असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाल्यास केंद्राकडे संपर्क साधून त्यांना दिलेले प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी पालिका प्रयत्न करेल. त्यानंतर त्यांना पुन्हा लस देण्यासंदर्भातील निर्णय घेण्यात येईल.
- सुरेश काकाणी,अतिरिक्त आयुक्त, मुंबई महापालिका