...तर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा !
By admin | Published: August 6, 2015 01:40 AM2015-08-06T01:40:55+5:302015-08-06T01:40:55+5:30
ठाण्यातील क्लस्टर डेव्हलपमेंट योजनेबाबत सोशो-इकॉनॉमिक अॅसेसमेंटचा अहवाल कोर्टात सादर करण्याच्या मुद्द्यावरून बुधवारी सार्वजनिक बांधकाममंत्री व ठाण्याचे पालकमंत्री
मुंबई : ठाण्यातील क्लस्टर डेव्हलपमेंट योजनेबाबत सोशो-इकॉनॉमिक अॅसेसमेंटचा अहवाल कोर्टात सादर करण्याच्या मुद्द्यावरून बुधवारी सार्वजनिक बांधकाममंत्री व ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा पारा चढला. नियम, कायदे यांचा बागुलबुवा दाखवून विषय चिघळत ठेवला आणि यापुढे इमारत कोसळली तर तुमच्यावर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करायला लावीन, असा इशारा त्यांनी बैठकीला उपस्थित सनदी अधिकाऱ्यांना दिला. ठाणे येथील इमारत दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता यांनी क्लस्टर डेव्हलपमेंटच्या अंमलबजावणीबाबत बैठक बोलावली होती. त्या बैठकीस नगरविकास सचिव नितीन करीर, गृहनिर्माण सचिव श्रीकांत सिंह, मुंबई महापालिका आयुक्त अजय मेहता, ठाणे महापालिका अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण, म्हाडा मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी झेंडे, झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाचे सीईओ असीम गुप्ता आदी सनदी अधिकारी उपस्थित होते. या अधिकाऱ्यांनी क्लस्टर डेव्हलपमेंटच्या अंमलबजावणीमधील अडचणी, नियमांच्या मर्यादा, न्यायालयाची बंधने यांचा पाढा वाचायला सुरुवात केली. अधिकाऱ्यांचा रोख पाहून एकनाथ शिंदे यांचा पारा चढला. तुम्ही या विषयातील अडचणी सोडवायला आहात की अडचणी सांगायला आहात, असा सवाल विचारला.
महेता यांनी ठाण्यात क्लस्टर डेव्हलपमेंट लागू करण्याबाबतचा सोशो-इकॉनॉमिक इम्पॅक्ट अॅसेसमेंट अहवाल महिनाभरात न्यायालयात सादर करण्याचे आदेश दिले.