मुंबई - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौऱ्याची चर्चा सर्वत्र सुरु आहे. डोनाल्ड ट्रम्प सहकुटुंब अहमदाबाद आणि दिल्ली दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात भारतासोबतच्या व्यापार संबंधी करार करण्यात येणार असल्याची माहिती आहे. मात्र तत्पूर्वी अहमदाबादेत ट्रम्प येणार असून तिथून साबरमती आश्रम भेट आणि केम छो मोदी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे. मात्र ट्रम्प यांच्या अहमदाबाद भेटीवरुन टीका होत आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले की, सध्या महाराष्ट्रात आणि देशाच्या राजकारणात एकाच गोष्टीची चर्चा शिवथाळीची आहे. अख्ख्या जगाला आश्चर्य वाटतंय, डोनाल्ड ट्रम्प मुंबईत आले असते तर त्यांनीही शिवथाळीची चव चाखली असती. राहुल शेवाळे यांनी आयोजित केलेल्या महाराष्ट्राची थाळी या कार्यक्रमाला ट्रम्प आणि त्यांची पत्नी येऊन रांगेत उभे राहून शिवथाळीचा अस्वाद घेतला असता असा टोला लगावला आहे. यापूर्वीही मनसेने ट्रम्प यांना अहमदाबादेत का? असा सवाल उपस्थित केला होता.
ट्रम्प हे भारताला भेट देणारे अमेरिकेचे सातवे राष्ट्राध्यक्ष आहेत. याआधी प्रत्येकी पाच वर्षांच्या अंतराने अनुक्रमे बिल क्लिंटन, जॉर्ज डब्ल्यू बुश व बराक ओबामा या राष्ट्राध्यक्षांनी भारताचा दौरा केला होता. इतरांच्या आणि ट्रम्प यांच्या दौऱ्यात दोन बाबतीत लक्षणीय फरक आहे. इतरांनी भारतासोबत पाकिस्तान किंवा शेजारच्या अन्य देशांनाही भेटी दिल्या होत्या. ट्रम्प मात्र फक्त भारताचा दौरा करणार आहेत. दुसरे असे की, इतर राष्ट्राध्यक्षांचे दौरे शासकीय व राजनैतिक पातळीवरचे होते. ट्रम्प यांच्या एकूण ३६ तासांच्या दौऱ्यात मात्र या अधिकृत कामांसाठी ठेवलेला वेळ जेमतेम तीन तासांचा आहे. यापैकी मंगळवारी दुपारी दिल्लीत ट्रम्प व मोदी यांच्यात सुमारे दीड तास अधिकृत भेट व चर्चा होईल. ट्रम्प प्रथमच भारतात येत असले तरी मोदी चार वेळा अमेरिकेला गेले तेव्हा व तीन वेळा अन्य निमित्ताने दोघांची भेट झालेली असून दोन्ही नेत्यांमधील व्यक्तिगत ‘रॅपो’ हे या दौऱ्याच्या यशापयशाचे मुख्य गमक असणार आहे.
दरम्यान, या दौऱ्यावर शिवसेनेच्या सामना मुखपत्रातूनही टीका करण्यात आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे फक्त 36 तासांच्या हिंदुस्थान भेटीवर येत आहेत. त्यांच्या भेटीबद्दल देशभरात कमालीची उत्सुकता वगैरे शिगेला पोहोचल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. ते काही तितकेसे खरे नाही. ट्रम्प हे अमेरिकेसारख्या स्वतःस महासत्ता वगैरे समजणाऱया व त्याबरहुकूम जगात फौजदारी करणाऱया एका देशाचे अध्यक्ष आहेत. ट्रम्प येतील व जातील. 36 तासांनंतर त्यांच्या येण्या-जाण्याच्या खुणाही देशाच्या मातीत राहणार नाहीत. ट्रम्प यांनी तिकडे वॉशिंग्टनमध्ये सांगितले की, ‘‘मी हिंदुस्थान भेटीवर जात आहे व तिथे पंतप्रधान मोदी यांच्याशी व्यापारावर चर्चा करणार आहे.’’ म्हणजे ट्रम्प यांच्या भेटीचा मतलब साफ झाला आहे. त्यांना येथे व्यापार वाढवायचा आहे व त्यासाठी ते 36 तासांसाठी येत आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आल्याने येथील गोरगरीब, मध्यमवर्गीय जनतेच्या जीवनात कानामात्रेचा फरक पडणार नाही. मग ट्रम्प यांच्या येण्याचे येथील जनतेला कौतुक किंवा उत्सुकता असण्याचा प्रश्न येतोच कुठे? असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
मोदी सरकारच्या कामांची पाहणी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कधी करणार?; शिवसेनेचा टोला
कराची दर्ग्याबाहेर अंडरवर्ल्ड डॉन दाऊदला ठार करण्यासाठी फिल्डिंग लावली, पण...
ट्रम्प यांच्या सुरक्षेसाठी चेतक कमांडोंसह RAF तैनात
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आजपासून भारत दौऱ्यावर; अहमदाबादमध्ये जय्यत तयारी