मुंबई: कोहिनूर मिल आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) नोटीस बजावली होती. त्यानंतर अंमलबजावणी संचालनालयाच्या कार्यालयाच्या नावाचे फलक हिंदीत असल्याने मनसेने देखील आक्रमक पवित्रा घेत ईडीलाच नोटीस पाठवली होती. याबाबत मनसेने मुंबई महापालिका कार्यालयाला पत्र पाठवून तक्रार केली आहे.
मनसेचे नेते संदीप देशपांडे म्हणाले की, मनसेने अंमलबजावणी संचलनायनाच्या कार्यालयाच्या नावाचे फलक हिंदीत असल्याने महाराष्टात शासकीय फलक मराठीतच असायला पाहिजे अशी तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे तसेच मुंबई महापालिकेकडे केली असून त्या नोटीसाची प्रत ईडीला पाठवली होती. त्यांमुळे या नोटिसीला ईडीकडून उत्तर मिळणे अपेक्षित असल्याचे सांगत, ईडीने नियम पाळणे आवश्यक आहे असं सांगितलं. यावरून जर ईडीने मराठीत बोर्ड लावला नाही तर काय करणार या पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला संदीप देशपांडेंनी मार्मिक उत्तर दिलं. ईडीने अपेक्षित उत्तर न दिल्यास 'ईडी'लाच कृष्णकुंजावर येऊन उत्तर द्यावे लागेल असा टोला लगावला.
मनसे विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागली असून नसेचे नेते संदीप देशपांडे व अभिजीत पानसे उपस्थि्तीत नाशिकमध्ये सोमवारी पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन नाशिक विधानसभा मधील जागेंचा आढावा घेण्यात आला. पत्रकारांशी बोलताना मनसेच्या कार्यकर्त्यांना विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागा, असा संदेश राज ठाकरेंनी दिला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कोहिनूर मिल गैरव्यवहार प्रकरणावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची गुरुवारी ईडीने तब्बल साडेआठ तास चौकशी केली. सकाळी 11.30 वाजता ईडीच्या अधिकाऱ्यांकडून ही चौकशी सुरु झाली होती. राज ठाकरेंनी ईडीच्या चौकशीला पूर्णपणे सहकार्य केल्याचं अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं. तर चौकशीनंतर रात्री 8.15 च्या सुमारास राज ठाकरे ईडीच्या कार्यालयाबाहेर पडले. त्यानंतर कुटुंबासह राज ठाकरे कृष्णकुंज या त्यांच्या निवासस्थानी रवाना झाले. त्यावेळी घराबाहेर अनेक मनसे कार्यकर्ते जमा झाले होते. या उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधताना राज ठाकरेंनी सांगितलं की, ईडीच्या चौकशीत मला जे काही सांगायचे आहे ते मी त्यांना सांगितले आहे. अशा कितीही चौकशी लावल्या तरीही माझं तोंड बंद ठेवणार नाही अशी प्रतिक्रिया राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिली.