Mumbai Hit and Run Case Marathi : वरळीतील 'हिट अॅण्ड रन' प्रकरणावर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. आरोपीला अटक करताना विहीत प्रक्रियेचे पालन न केल्याने न्यायालयाने कानउघाडणी केली. वरळीतील अँट्रिया मॉल जवळ मिहीर शाह याने एका दुचाकीला धडक दिली होती. यात कावेरी नाखवा यांचा मृत्यू झाला होता.
न्यायमूर्ती भारती डांगरे आणि मंजूषा देशपांडे यांच्या पीठासमोर दोन याचिकांवर सोमवारी (२३ सप्टेंबर) सुनावणी झाली. दोन्ही याचिका आरोपी मिहीर शाह आणि त्याचा कारचालक राजऋषी बिदावत यांनी दाखल केलेल्या आहेत. दोघांनाही केलेली अटक बेकायदेशीर असल्याचे आदेश देण्याची मागणी याचिकेतून केलेली आहे. कारण पोलिसांनी अटकेचे कारण लिखित स्वरूपात दिलेले नाही.
वरळी 'हिट अॅण्ड रन': कोर्टात काय घडले?
आरोपींचे वकील निरंजन मुंदार्गी आणि ऋषी भूता यांनी प्रतिज्ञा पत्राद्वारे न्यायालयाला सांगितले की, अटकेचे कारण लिखित स्वरुपात नाही, हे पोलिसांनी मान्य केले आहे.
दरम्यान, न्यायालयाने आरोपींना विचारले की, तुम्ही कसे नागरिक आहात? तुम्ही तुमच्या अधिकारांबद्दल बोलत आहात, पण पीडिताच्या अधिकारांचे काय? गुन्ह्याची गंभीरता आम्हाला रोखत आहे. तुम्ही जे केले आहे, त्यामुळे पीडिताचे अधिकार चिरडले गेले आहेत. अशा प्रकरणात जर आम्ही तांत्रिक मुद्द्यांवर लक्ष दिले, तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही."
"अटक का केली हे आरोपीला माहिती असायला हवे"
न्यायालय पुढे म्हणाले की, "आम्ही कायदा आणि घटनेतील क्रूरता यांमध्ये समतोल ठेवण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे आरोपीला हे माहिती असायला हवे की, त्याला अटक का केले जात आहे. त्याला त्याच्यावर असलेल्या आरोपांबद्दल माहिती द्यायला नको का? विहीत प्रक्रियेनुसार पोलिसांना आरोपीच्या अटकेची कारणे लिखित स्वरुपात सांगायचे असतात. आरोपी कावेरी नाखवा यांना दोन किमी पर्यंत फरफटत नेले", असेही न्यायालय म्हणाले.