मुंबई : रा. स्व. संघाने सत्तेत आणलेले सरकार केंद्रात असताना त्यांच्यावर राम मंदिरप्रश्नी आंदोलन करण्याची पाळी येत असेल, तर त्यांनी हे सरकारच खाली खेचले पाहिजे, असे मत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी येथे व्यक्त केले.अयोध्यातील राममंदिरासाठी सन १९९२प्रमाणे आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी दिला आहे. याबाबत पत्रकारांनी विचारले असता ठाकरे म्हणाले की, शिवसेनेने राम मंदिराचा मुद्दा हाती घेतल्यानंतर संघाला जाग आली. नाहीतर तो मुद्दा बाजूलाच पडला होता. कलम ३७०, समान नागरी कायदा, असे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. हे प्रश्न हिंदुत्वाशी निगडित आहेत. तुम्ही सत्तेत आणलेल्या सरकारला ते सोडवता येत नसतील, तर ते सरकार खाली खेचा, असा सल्लाही त्यांनी संघाला दिला.तसेच दुष्काळग्रस्त भागाचा दौरा करणार असल्याचे सांगून या भागाला मदत करण्याचे आदेश आमदारांना देण्यात आल्याची माहितीही ठाकरे यांनी या वेळी दिली. दुष्काळी भागात तातडीने चारा छावण्या सुरू कराव्यात, असेही ते म्हणाले. ठाकरे यांच्या उपस्थितीत शुक्रवारी शिवसेना भवनमध्ये शिवसेनेचे आमदार, खासदार आणि पदाधिकारी यांची लोकसभा निवडणुकीसंदर्भात तयारीसाठी बैठक झाली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
...तर संघाने सरकारच खाली खेचले पाहिजे - उद्धव ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Published: November 03, 2018 4:38 AM