...तर आजोबा वाचले असते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:06 AM2021-03-08T04:06:54+5:302021-03-08T04:06:54+5:30

केअरटेकरचा जबाब; मुलुंडमधील हत्या व आत्महत्याप्रकरण लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुलुंडमध्ये मानसिकदृष्ट्या आजारी असलेला शार्दुल मांगले हा ...

... then Grandpa would have survived | ...तर आजोबा वाचले असते

...तर आजोबा वाचले असते

Next

केअरटेकरचा जबाब; मुलुंडमधील हत्या व आत्महत्याप्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुलुंडमध्ये मानसिकदृष्ट्या आजारी असलेला शार्दुल मांगले हा २० वर्षीय तरुण वडिलांच्या हत्येसाठी त्यांच्या मागे चाकू घेऊन धावताच, घरातील केअरटेकरने त्याच्या आजोबांना बाथरूममध्ये लपण्याचा सल्ला दिला. मात्र, त्यांनी ताे ऐकला नाही. वडिलांची हत्या केल्यानंतर शार्दुलने आजोबांचीही हत्या केली. आजोबांनी केअरटेकरचे ऐकले असते, तर ते वाचले असते, अशी माहिती केअर टेकरच्या जबाबातून समोर आली आहे.

शार्दुल हा कॉमर्सचा विद्यार्थी आहे. त्याच्या रागीट स्वभावामुळे त्याचे यापूर्वी समुपदेशनही केले होते. शनिवारी सकाळच्या सुमारास केअरटेकर अनिल कांबळे हे त्याचे वडील मिलिंद यांच्यासाठी चहा आणण्यासाठी किचनमध्ये गले हाेते. दरम्यान, वडिलांनी अभ्यासासाठी तगादा लावताच, शार्दुलने रागाच्या भरात चाकूने त्यांच्यावर हल्ला चढविला. त्यांच्या किंकाळीने केअरटेकर बाहेर आले. त्यावेळी शार्दुल वडिलांवर वार करताना त्यांनी पाहिले. घाबरून वडील पायऱ्यांच्या दिशेने धावत गेले. शार्दुलही त्यांच्या मागून धावत गेला व त्याने पायऱ्यांवरच वडिलांवर चाकूने वार केला.

प्रसंगावधान राखत केअरटेकर कांबळे यांनी ८५ वर्षीय आजोबा सुरेश मांगले यांना बाथरूममध्ये लपण्याचा सल्ला दिला. मात्र, ते काय झाले ते बघताे, असे म्हणून तेथेच थांबून राहिले. घाबरलेल्या कांबळे यांनी बाथरूममध्ये स्वतःला लॉक करून घेतले. दरम्यान, वडिलांची हत्या केल्यानंतर शार्दुलने आजोबांवरही वार करून त्यांचा जीव घेतला व त्यानंतर आत्महत्या केली.

* केअरटेकरला मानसिक धक्का

घटनेची माहिती मिळाल्यानंतर मुलुंड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दोन्ही मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर केअरटेकर बाथरूममध्ये असल्याचे समजताच, पोलिसांनी त्यांना बाहेर येण्याचा सल्ला दिला. मात्र, बराच वेळ झाला, तरी केअरटेकर कांबळे हे दरवाजा उघडण्यास तयार नव्हते. अर्ध्या ते पाऊण तासांनी ते बाहेर आल्याचे समजते. या घटनेमुळे त्यांना मानसिक धक्का बसला आहे.

...................

Web Title: ... then Grandpa would have survived

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.